सौरभ ढोरे
काटोल : काटोल तालुक्यातील बंधारा दुरुस्तीच्या नावावर मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार झाला. याबाबत मिळालेल्या तक्रारीच्या आधारावर लघुसिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीही केली. मात्र, याला सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही दोषी कंत्राटदारावर कारवाई झाली नाही. मात्र, अशा कंत्राटदाराकडून पुन्हा या कामाची दुरुस्ती करून घेतली जात असल्याची माहिती आहे.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी चांगली सुविधा मिळावी यासाठी काटोल तालुक्यात २०१९-२० मध्ये काही बंधाऱ्यांची लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली. मात्र, या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आठ महिन्यांपूर्वी लघुसिंचन विभागाकडे करण्यात आल्या. याची चौकशीही लागली. अधिकारीही आले. मात्र, पुढे काही झाले नाही.
तालुक्यात जलसंधारणाच्या कामाअंतर्गत कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग, साठवण यासह आदी कामे करण्यात आली. गत तीन दशकापासून ही प्रक्रिया सुरूच आहे. यावर शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले. यापैकी बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने हे बंधारे बिनकामाचे ठरले आहेत. अशातच अजूनही दुरुस्तीच्या नावे लाखो रुपयांचा निधी उचलला जात आहे. यात निधीतून तालुक्यातील महसखापरा येथे बंधारा दुरुस्तीसाठी १४.७२ लाख, जुनेवानी येथे ४.१७ लाख, तर सोनोली येथे नवीन बंधारा बांधकामासाठी १४.४२ लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र, ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. चौकशीनंतर शाखा अभियंता व कंत्राटदारांवर कारवाई अपेक्षित होती. मात्र, कारवाई तर सोडा उलट कंत्राटदारांना दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध करून देत अभय देण्यात आले. यावर निश्चितच सरकारने मंथन करणे गरजेचे आहे.
दुरुस्ती तरीही....
पाणी साठवूण ठेवणे हा बंधारा निर्मितीचा मूळ उद्देश आहे. मात्र, तालुक्यात दुरुस्ती करण्यात आलेल्या बंधाऱ्यात पाणी झिरपत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत येथे खरेच पाणी साठून राहील का, हा प्रश्नच आहे.
अधिकाऱ्यांची भूमिका आश्रयदात्यांची
बंधारा दुरुस्तीचे कामे सुरू असता सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी साईट पाहणी करणे आवश्यक आहे. पाहणी करण्यात आली असेल, तर निकृष्ट बांधकाम त्याचवेळी का रोखण्यात आले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची भूमिका कंत्राटदारांच्या आश्रयदात्याची आहे का, असा सवाल विचारला जात आहे.
---
तक्रार प्राप्त होताच पाहणी करण्यात आली. चौकशी करून डिफेक्ट दुरुस्ती करून घेण्याचे काम सुरू आहे.
-आर. एच. गुप्ता
जिल्हा जलसंधारण अधिकारी