तीन महिन्यांपूर्वी वाडी ग्रामपंचायतला नगर परिषदेचा दर्जा मिळाला. ग्रामपंचायत बरखास्त झाली. मात्र अद्याप निवडणूक झाली नसल्याने प्रशासकामार्फत काम सुरू आहे. परिणामी, तेथील विकासकामे खोळंबली असून कर्मचारीसुद्धा सुस्त झाल्याचे दिसून येते. वाडी ग्रामपंचायतला २५ आॅगस्ट २०१४ रोजी नगर परिषद घोषित करण्यात आले. नगर परिषदेचा दर्जा मिळताच ग्रामपंचायत बरखास्त करून नागपूर ग्रामीणच्या तहसीलदारांकडे प्रशासक म्हणून कार्यभार देण्यात आला. प्रशासक नियुक्त केला असला तरी लोकशाही मार्गाने नगर परिषदेचे कामकाज होणे गरजेचे आहे. त्यासाठी निवडणूक होणे आवश्यक आहे. परंतु, निवडणूकच न झाल्याने वाडी नगर परिषदेचे कामकाज अद्याप सुरळीत झाले नाही, असे दिसून येते. ग्रामपंचायत बरखास्त होताच येथील विकासकामे ठप्प पडली आहेत. प्रशासक म्हणून तहसीलदार आवश्यक तेवढा वेळ येथील कामासाठी देऊ शकत नाही. त्यातच त्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नाही. लोकप्रतिनिधी नसल्याने विकासकामांचा तसेच समस्या सोडविण्यासाठी तगादा लावणारा कुणीही नसल्याने नगर परिषदेचा ‘रामभरोसे कारभार’ सुरू आहे. नागरिकांना नगर परिषदेकडून विविध प्रमाणपत्राची आवश्यकता पडते. मात्र प्रशासक (तहसीलदार) नियमित कार्यालयात बसत नसल्याने नागरिकांना वारंवार नगर परिषदेच्या चकरा माराव्या लागतात. दोन-तीन दिवस कधी-कधी तर आठवडाभर चकरा मारल्यानंतर नागरिकांना प्रमाणपत्र मिळते, ही येथील वस्तुस्थिती आहे. नगर परिषद घोषित होताच या भागातील वॉर्ड क्र. २, ३, ४, ५ चे प्रतिनिधित्व करणारे जिल्हा परिषद सदस्य तसेच वॉर्ड क्र. २ व ४ आणि वॉर्ड क्र. ३ व ५ चे पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यामुळे या भागातील प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून ना पंचायत समितीत मांडू शकत; ना जिल्हा परिषदेत! असे असल्याने विकासकामे खोळंबली आहेत. समस्या सोडविल्या जात नाही. उलट समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे.
वाडी पालिकेची निवडणूक केव्हा?
By admin | Updated: November 22, 2014 02:37 IST