पोलिसांचे ढुंडो ढुंडो रे : अनेकांची चौकशी नागपूर : इफ्तखार हसन अब्दुल अजिज (वय ३६) याच्यावर ज्या पध्दतीने प्राणघातक हल्ला झाला, ती पद्धत पाहता मारेकरी ‘सुपारी किलरच आहेत’ तसेच ते मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सिमेवरच्या शहरातील असावे, या अंदाजावरही तपास अधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. मात्र, इफ्तखारचा ‘गेम प्लान‘ कुणाचा आणि सुपारी किलरला बोलविले कुणी त्याचा अंदाज बांधणे पोलिसांसाठी कठीण काम ठरले आहे. नमाज पठण करून घराकडे निघालेल्या इफ्तखार हसन याला गुरुवारी पहाटे ४.४५ ते ५ च्या सुमारास चार हल्लेखोरांनी मोमिनपुऱ्यातील पोलीस चौकीजवळ रोखले. दोघांनी त्याचे हात पकडले तर एकाने त्याच्यावर पिस्तुलातून डोक्यावर, गळ्यावर (कानाखाली) गोळ्या झाडल्या. एका हल्लेखोराने चाकूने भोसकण्याचाही प्रयत्न केला. या घटनेपासून मोमिनपुऱ्यात प्रचंड तणाव आहे. इफ्तखारवर शुअरटेक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तेथेही मोठी गर्दी आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर प्रदीर्घ शस्त्रक्रिया करून गोळ्या बाहेर काढल्या. त्याला शुक्रवारी काही वेळेसाठी शुद्धही आली होती. मात्र, तो परत बेशुद्ध झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. (प्रतिनिधी)अवघी यंत्रणा तपासकामीपोलीस चौकीजवळच ही घटना घडल्यामुळे पोलिसांच्या जास्तच जिव्हारी लागले आहे. त्यामुळे केवळ तहसीलच नव्हे तर उपराजधानीतील २३ ही पोलीस ठाण्यातील यंत्रणा आणि गुन्हेशाखेची पथके इफ्तखारच्या हल्लेखोरांचा गेल्या ३६ तासांपासून निरंतर शोध घेत आहेत. सुमित पासून लकी पर्यंत आणि साझा पासून काल्यापर्यंत पोलिसांनी सुमारे दोन डझन गुन्हेगारांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. मात्र, इफ्तखारचा गेम प्लान कुणी केला, त्याचे पक्के धागेदोरे पोलिसांना गवसले नाही. याअनुषंगाने पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी पोलीस अधिकाऱ्यांची एक प्रदीर्घ बैठक घेऊन या प्रकरणाचा तातडीने तपास लावण्याचे आदेश पोलिसांना दिले. आबिदची पुनरावृत्ती मृत्युशी झुंजत असलेला इफ्तखार खंडणी वसुली, जमीन बळकावणे आणि अमली पदार्थाच्या धंद्यात गुंतलेला आहे. त्याने साथीदारांसह आबिदची हत्या याच रमजानच्या महिन्यात केली होती. त्यामुळे आबिदच्या साथीदारांनीच त्याचा गेम प्लान केल्याचा संशय आहे. मात्र, साजाचा ‘बच्चा’ आणि इप्पाचा खास मानला जाणाऱ्या इफ्तखारसोबत अनेक गुंडांचे शत्रुत्व असल्यामुळे दुसऱ्याही अनेकांवर पोलिसांचा संशय आहे. गांजा आणि दीड कोटीच्या डीलिंगवर पोलिसांनी नजर रोखल्यास या प्रकरणातील आरोपींचे धागेदोरे गवसू शकतात. हे गुन्हेगार कुठे आहेत ?इफ्तखारच्या हत्येच्या प्रयत्नाची घटना हसनबागमधील गफ्फार कालूच्या हत्येकडे अंगुलीनिर्देश करणारी आहे. कुख्यात समशेरचा भाऊ गफ्फार याची नंदनवनमध्ये दीड वर्षांपूर्वी अशाच प्रकारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडासाठी समशेरच्या विरोधी गटातील गुन्हेगारांनी परप्रांतिय गुंडांना मोठी सुपारी दिली होती. हे गुन्हेगार आता कुठे आहेत, त्यांचा शोध घेण्याचीही गरज संबंधित सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
इफ्तखारचा ‘गेम प्लान’ कुणाचा?
By admin | Updated: July 11, 2015 03:08 IST