योगेश पांडेनागपूर : ऑनलाइन ट्रेडिंग किंवा वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधी असल्याची बतावणी करत नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांचे बँक खाते रिकामे करण्याच्या मोडस ऑपरेंडीने वर्षभरापासून चांगलाच जोर पकडला आहे. मात्र, त्यासाठी सायबर गुन्हेगारांना भारतीय व्हॉट्सअॅप क्रमांकाचे खाते आवश्यक असते. त्यासाठी देशात विविध ठिकाणी एजंट्स नेमून सामान्य नागरिकांच्या नावाने चक्क 'घोस्ट व्हॉट्सअॅप' खाते उघडण्यात येत आहे. संबंधित क्रमांकाचे सिमकार्ड एखाद्या सामान्य नागरिकाच्या नावावर असते. मात्र, त्याची त्याला कुठलीही कल्पनादेखील नसते आणि त्यावर येणारे 'ओटीपी' या एजंट्सकडून विदेशातील सायबर गुन्हेगारांना व्हॉट्सअॅप खाते व इतर कामांसाठी विकलेदेखील जातात.
सहारनपूर येथील एका मोठ्या कारवाईनंतर हा प्रकार समोर आला आहे. अशा 'घोस्ट व्हॉट्सअॅप' खात्यांना फसून नागपूर व महाराष्ट्रातील नागरिकांनी आतापर्यंत शेकडो कोटींहून अधिक रुपये गमावले आहे. ही 'घोस्ट व्हॉट्सअॅप'ची संकल्पना अनेकांसाठी नवीन आहे. मात्र, त्यासाठी वापरण्यात येणारी 'मोडस ऑपरेंडी' मात्र फार जुनी आहे. एखाद्या सरकारी योजनेची माहिती, स्वयंसेवी संस्थेचे सर्वेक्षण किंवा तत्सम गोंडस नावांखाली सामान्य नागरिकांना संपर्क करण्यात येतो. यात त्यांचे तपशील, आधार कार्ड क्रमांक वगैरे घेण्यात येतात. याशिवाय त्यांच्याकडून त्याचे झेरॉक्सदेखील घेण्यात येतात. काही टोळ्यांकडून चक्क एखाद्या मोबाइल कंपनीसाठी काम करणारा कर्मचारी किंवा कंत्राटदाराची मदत घेण्यात येते. त्यांच्याकडील डेटा वापरून सिमकाईस मिळवून ते अॅक्टिव्हेट करण्यात येतात.
काही वेळा नवीन सिमकार्ड घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या नावावर दोन किंवा अधिक सीमकार्ड घेण्यात येतात. काही तरी तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगत त्यांना सिमकार्ड देण्याचे टाळण्यात येते. मात्र, त्यांच्या नावावर इश्यू झालेले सीमकार्ड अॅक्टिव्हेट होऊन सायबर गुन्हेगारांसाठी वापरण्याची तयारी पूर्ण झाली असते.
तुमच्या नावावर नोंदणीकृत सिमकार्डची संख्या अशी तपासा
- 'संचार साथी' पोर्टल उघडा
- संबंधित पोर्टलवर 'सिटिझन सेंट्रिक सर्व्हिसेस'वर क्लिक करा
- त्यानंतर त्यातील 'क्नो मोबाइल नंबर ऑन युअर नेम' यावर क्लिक करा
- उघडलेल्या 'विंडो'मध्ये मोबाइल क्रमांक व आलेला ओटीपी टाका
- जर तुमच्या नावावर अपरिचित मोबाइल क्रमांक आढळला तर त्याला ब्लॉक करू शकता
जाळ्यात फसलेल्यांचा बसतो विश्वासभारतातील व आपल्याच भागातील व्हॉट्सअॅप क्रमांक पाहून लोकदेखील संबंधित क्रमांकावर संवाद साधतात. काही लोक ट्रूकॉलरसारख्या अॅप्सवर संबंधित क्रमांक कुणाचा आहे याची चाचपणी करतात. त्या क्रमांकावर ज्याच्या नावावर सीमकार्ड आहे मात्र ज्याला त्याची तीळमात्र कल्पनादेखील नाही त्याचे नाव येते. त्यामुळे लोक त्यावर विश्वास ठेवतात आणि अलगदपणे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे आपल्या आधार क्रमांकावर किती सिमकार्ड्स आहेत हे प्रत्येकाने नियमितपणे तपासणे आवश्यक आहे.
एका ओटीपीची किंमत...८० ते १०० रुपयेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अॅक्टिव्हेट झालेल्या सिमकाईसचे तपशील चीन, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया येथे बसलेल्या सायबर गुन्हेगारांना देण्यात येतात. ते वेब व्हॉट्सअॅप किंवा मोबाइलवर व्हॉट्सअॅप सुरू करण्यासाठी संबंधित मोबाइल क्रमांक टाकतात. तो मोबाइल क्रमांक टाकल्यावर त्याचा ओटीपी भारतात बसलेल्या एजंट्सकडे असलेल्या मूळ मोबाइल क्रमांकावर येतो. तो ओटीपी ८० ते १०० रुपये घेऊन त्यांना पुरविल्या जातो. त्यानंतर या व्हॉट्सअॅप क्रमांकांच्या माध्यमातून कधी गुंतवणूक तर कधी नोकरी तर कधी इतर फसवणुकीच्या रॅकेट्समध्ये करण्यात येतो.