जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी : चंद्रपूरच्या तीन कलावंतांच्या कलाकृतींचे प्रदर्शन नागपूर : ईश्वर हा खरा कलाकार; कारण त्याने निसर्गाची निर्मिती केली आहे. ईश्वराच्या निर्मितीचे निरीक्षण करून, आपल्या आकलन शैलीने त्याचे प्रतिबिंब कॅन्व्हॉसवर उतरविण्याची किमया करणारा कलावंत हा खरा ईश्वरभक्त आहे. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये चंद्रपूरच्या तीन कलावंतांच्या चित्र प्रदर्शनात याची अनुभूती येते. त्यांनी जलरंगांचा कलाविष्कारातून चंद्रपूर शहराचे प्रतिबिंब मांडले आहे. या चित्र प्रदर्शनाचे शनिवारी शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ललित कला विभागाच्या विभागप्रमुख डॉ. मुक्तादेवी मोहिते, चित्रकार मिलिंद लिंबेकर उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी किरण पराते, भारत सलाम व देवा रामटेके या कलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातून चंद्रपूर नगरीचे अतिशय सुंदर रेखाटन केले आहे. तसे चंद्रपूर प्रदूषणासाठी प्रसिद्ध असले तरी, चंद्रपूरचे ऐतिहासिक महत्त्व त्यांनी चित्रातून मांडले आहे. आधुनिक काळात जुन्या वास्तूंची होत असलेली दुरवस्था या कलावंतांनी चित्रांतून मांडली आहे. हेमाडपंथी मंदिरांची कलाकुसर आणि ऐतिहासिक वास्तूंना हुबेहूब साकारले आहे. एकीकडे लयास जात असलेली ग्रामीण व्यवस्था, तर दुसरीकडे ग्रामीण भागात ओसंडून वाहत असलेला निसर्ग ही तुलना त्यांच्या चित्रातून अनुभवायला मिळते. आधुनिक रेल्वेस्थानक, चकाकणाऱ्या मोटारींच्या लाईटांचा प्रकाश साकारताना या कलावंतांनी आधुनिकतेचा ग्रामीण व्यवस्थेवर होत असलेला परिणाम, अडगळीत पडलेली बैलगाडी व थांबलेल्या सायकलची चाके हे चित्र साकारून दर्शविला आहे. निसर्गसमृद्ध चंद्रपूरचे वैभव त्यांनी साकारले आहे. चंद्रपूरचे प्रदूषण थांबविण्यासाठी, चित्रांच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेशच त्यांनी दिला आहे. चित्रातील पाण्याचे प्रतिबिंब असो की श्रावणातील पानगळ कुंचल्यातून साकारताना रंगांचाही उपयोग आवश्यकतेनुसार केला आहे. या चित्रांच्या रंगसंगती आणि त्यातील आशय लक्षात घेऊन शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे अधिष्ठाता क्षीरसागर म्हणाले की, या प्रदर्शनातून चंद्रपूरच्या बहुतेक भागांचे दर्शन होते. (प्रतिनिधी)
जलरंगाचा कलाविष्कार
By admin | Updated: December 13, 2015 03:05 IST