सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठी जागा मिळत नसल्याने बुटीबोरी नगरपरिषदेला शहरात रोज जमा होणारा कचरा वेणा नदीच्या काठावर टाकावा लागतो आहे. या गार्बेज डम्पजवळच बुटीबोरीला पाण्याचा पुरवठा करणारे पम्पिंग स्टेशन असल्याने नागरिकांच्या व वेणा नदीच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या म्युनिसिपल सॉलिड वेस्ट (मॅनेजमेंट अँड हँडलिंग) रुल्स-२०००- शहरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम - २००० नुसार कुठल्याही पाणवठ्यापासून ५०० मीटर हद्दीत कचरा टाकता येत नाही किंवा साठवणूकही करता येत नाही. २०१५ मधील मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तसे करणे हा फौजदारी गुन्हा ठरतो.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार नगरपलिकांच्या क्षेत्रात रोज पाच टनापर्यंत कचरा निर्माण होत असेल तर स्थानिक नगरपालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेऊन कचºयाची विल्हेवाट लावता येते. कचरा पाच टनापेक्षा अधिक असेल तर मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंंडळाची परवानगी आवश्यक असते.गेल्या वर्षापर्यंत बुटीबोरी हे ग्रामपंचायत क्षेत्र होते व कचऱ्याची मात्रा पाच टनापेक्षा कमी होती. त्यामुळे ग्रामपंचायत लोधीशहा नावाच्या दर्ग्याजवळ कचरा टाकत होती. आता नगरपरिषद झाल्यामुळे अनेक वस्त्या व लेआऊट शहरसीमेत आल्याने दररोज सात ते आठ टन कचरा गोळा होतो आहे व त्याची विल्हेवाट पूर्वीच्या जागेवर नगर परिषद करते आहे. ही जागा नदीपात्रापासून २० मीटर आहे. मोठी जागा नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.याबाबतीत संपर्क केला असता. बुटीबोरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोज देसाई यांनी जुन्याच जागेवर सात ते आठ टन कचऱ्याची विल्हेवाट होते आहे हे मान्य केले. ‘‘पण आम्ही मोठी जागा शोधतो आहोत ती मिळताच नव्या जागेवर कचऱ्याची विल्हेवाट लावू’’ असे आश्वासन देसाई यांनी दिले.बुटीबोरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेश (बबलू) गौतम म्हणाले मी प्रथमच नगराध्यक्ष झालो आहे व नगर परिषदेची पहिली बैठक ३० जुलैला आहे, त्यावेळी या विषयावर चर्चा करून निर्णय घेईन.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी आनंद काटोले यांनीही हा प्रकार गंभीर असून त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले.बुटीबोरीच्या नागरिकांच्या व वेणा नदीच्या सुरक्षेला निर्माण झालेला हा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन बुटीबोरी नगर परिषदेला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देणार का हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.
नागपुरातील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीचा कचरा वेणा नदीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 13:01 IST
शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठी जागा मिळत नसल्याने बुटीबोरी नगरपरिषदेला शहरात रोज जमा होणारा कचरा वेणा नदीच्या काठावर टाकावा लागतो आहे.
नागपुरातील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीचा कचरा वेणा नदीत
ठळक मुद्देकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठी जागाच नाहीपम्पिंग स्टेशनलाही धोका