नागपूर : वातावरणात झालेल्या बदलामुळे पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने गुरुवारी तुरळक पावसाचा इशारा दिला आहे. बुधवारी सायंकाळनंतर वातावरणातील गारवाही वाढला आहे.
हवामान विभागाच्या मागील २४ तासातील नोंदीनुसार, नागपुरातील कमाल तापमान १७.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळी ६३ टक्के आर्द्रता होती, सायंकाळी त्यात घट होऊन ५५ टक्के नोंद झाली. दृश्यताही १ ते २ किलोमीटर होती. सायंकाळनंतर मात्र शहरात गारवा वाढला.
विदर्भामध्ये गोंदियातील तापमानाचा पारा सर्वाधिक खालावलेला होता. तिथे १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. अकोला आणि बुलडाणा शहरात अनुक्रमे १४.७ आणि १४ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस तर वर्धा येथे १५.६ आणि अमरावतीमध्ये १६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
नागपूरसह चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन ठिकाणी पारा १७ अंश सेल्सिअसवर होता. गडचिरोलीत १७ तर चंद्रपुरात १७.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद घेण्यात आली.