लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - रात्रीच्या वेळी रस्त्यावर लघुशंकेला थांबलेल्या वर्धा (गणेशनगर, बोरगाव) येथील एका तरुणाला चार लुटारूंनी चाकूने भोसकून लुटले. निखिल भीमराव क्षीरसागर असे त्याचे नाव आहे. रविवारी रात्रीच्या वेळी वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
निखिल मेकॅनिकल आहे. त्याला गेल्या आठवड्यात कापसीच्या एका कंपनीत नोकरी मिळाली. रविवारी सकाळी तो पत्नी आणि घरचे सामान घेऊन कापसीत आला. दिवसभर सामान लावल्यानंतर तो रात्री १० च्या सुमारास वर्धेला मोटरसायकलने परत निघाला. जबलपूर-हैदराबाद हायवेच्या तरोडी पुलाजवळ तो लघुशंकेसाठी थांबला. तेवढ्यात दोन दुचाकींवर चार लुटारू आले. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून निखिलजवळची बॅग हिसकण्याचा प्रयत्न केला. निखिलने तीव्र प्रतिकार केला. यावेळी आरोपींनी त्याला मारहाण करून चाकूने भोसकले आणि त्याच्याजवळची २० हजार ४०० रुपये असलेली बॅग हिसकून पळून गेले. जखमी निखिलने रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांच्या मदतीने रुग्णालय गाठले. उपचारादरम्यान वाठोडा पोलिसांना माहिती कळविली. पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
यापूर्वीही घटना घडल्या
पारडी, वाठोडा, हुडकेश्वर या भागातून गेलेल्या रिंगरोडवर रात्रीच्या लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. अंधाऱ्या ठिकाणी गाठून दुचाकीचालकांना मारहाण करून लुटल्याच्या घटना यापूर्वीही या भागात घडल्या आहेत. एखादी सराईत टोळीच या भागात हे गुन्हे करीत असावी, असा संशय असून, पोलीस त्यांचा छडा लावण्याचे प्रयत्न करीत आहेत.