उपराजधानीत ‘सायबर’ गुन्ह्यांचा ‘व्हायरस’ वाढीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 09:01 AM2020-10-07T09:01:40+5:302020-10-07T09:03:56+5:30

cyber crime, Nagpur News मोठ्या शहरांसोबतच उपराजधानीतदेखील सायबर गुन्ह्यांची संख्या वाढीस लागली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक गुन्हे हे फसवणुकीचे होत असल्याचे दिसून आले.

The 'virus' of 'cyber' crimes has increased in the Nagpur | उपराजधानीत ‘सायबर’ गुन्ह्यांचा ‘व्हायरस’ वाढीस

उपराजधानीत ‘सायबर’ गुन्ह्यांचा ‘व्हायरस’ वाढीस

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वाधिक ५५ टक्के गुन्हे फसवणुकीचेचौकशीसाठी प्रलंबित प्रकरणांची टक्केवारी राज्यात सर्वाधिक

योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सबकुछ ऑनलाईनच्या जमान्यात सायबर गुन्हेगारी डोकेदुखी बनू लागली आहे. इतर मोठ्या शहरांसोबतच उपराजधानीतदेखील सायबर गुन्ह्यांची संख्या वाढीस लागली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक गुन्हे हे फसवणुकीचे होत असल्याचे दिसून आले. दुर्दैवाची बाब म्हणजे या प्रकरणांची चौकशी संथ गतीने होत असल्याचे चित्र असून २०१९ साली नागपूरच्या प्रलंबित प्रकरणांची टक्केवारी ही राज्यात सर्वाधिक होती
एनसीआरबीच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. २०१९ साली नागपुरात सायबर गुन्ह्यांचे ११९ गुन्हे दाखल झाले. यातील तब्बल ६६ गुन्हे हे फसवणुकीचे होते, तर २४ गुन्हे महिलांची छळवणूक करण्याचे होते. सोबतच घोटाळ्याच्या १० गुन्ह्यांची नोंद झाली. विविध गुन्ह्यांसाठी एका महिलेसह एकूण ५६ जणांना अटक करण्यात आली.

लैंगिक छळवणुकीमुळे २४ गुन्हे
विविध कारणांमुळे संताप आल्याने सायबर क्राईमचे १० गुन्हे घडले. तर महिला व मुलींची लैंगिक छळवणूक करण्याचा उद्देश असलेले २४ गुन्हे दाखल झाले. ६८ प्रकरणांत आरोपींचा उद्देश हा केवळ घोटाळा करणे हाच होता.

चौकशीचा वेग संथच
पोलिसांकडून चौकशीसाठी २०१९ मधील ११९ तर अगोदरची २४३ प्रकरणे होती. यातील ५३ प्रकरणांतच चौकशी पूर्ण होऊ शकली तर वर्षाअखेरीस ३०९ प्रकरणांत चौकशी प्रलंबित होती. चौकशी प्रलंबित असण्याची टक्केवारी ८५.४ टक्के इतकी होती. ही टक्केवारी राज्यात सर्वात जास्त ठरली. मुंबईचा आकडा ८२.९ टक्के तर पुण्याची टक्केवारी ६७.५ टक्के इतकी होती.

दोषसिद्धीचे प्रमाण शून्य
न्यायालयात सायबर क्राईमचे ४२ खटले दाखल करण्यात आले. या कालावधीत जुन्या तसेच तत्कालीन दाखल अशा १७८ खटल्यांवर सुनावणी झाली. यात एकालाही शिक्षा झाली नाही तर ३ प्रकरणांतील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. वर्षाअखेरीस १७५ प्रकरणांची सुनावणी प्रलंबित होती व दोषसिद्धीचा दर शून्य इतका होता.

 

 

Web Title: The 'virus' of 'cyber' crimes has increased in the Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.