नागपूर : शनिवारी नागपूर रेल्वेस्थानकावर कॅम्प कोर्टचे आयोजन करण्यात आले. रेल्वे नियमांचा भंग करणाऱ्या २६ जणांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई करून त्यांना कॅम्प कोर्टमध्ये हजर केले. रेल्वे न्यायालयाने त्यांना २१,३०० रुपये दंड सुनावला.
रेल्वेगाड्यात अधिकृत परवाना असल्याशिवाय खाद्यपदार्थांची विक्री करणे गुन्हा आहे. तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून अनेकजण रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थांची विक्री करतात. शनिवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी १२ अवैध व्हेंडरविरुद्ध रेल्वे अॅक्ट १४४ नुसार कारवाई केली. रेल्वे न्यायालयाने त्यांना प्रत्येकी १५०० याप्रमाणे १८ हजार रुपये दंड सुनावला. विनाकारण रेल्वेगाडीची चेन ओढून गाडी थांबविणे गुन्हा आहे. एका प्रवाशाने विनाकारण चेन पुलिंग केल्यामुळे त्याच्याविरुद्ध रेल्वे अॅक्ट १४१ नुसार कारवाई केली. त्याला रेल्वे न्यायालयाने ७०० रुपये दंड सुनावला. रेल्वेस्थानक आणि परिसरात घाण पसरविणे कायद्याने गुन्हा आहे. घाण पसरविणाऱ्या १० जणांना आरपीएफने पकडून त्यांच्याविरुद्ध रेल्वे अॅक्ट १४५ नुसार गुन्हा दाखल केला. त्यांना रेल्वे न्यायालयाने प्रत्येकी २०० रुपये या प्रमाणे २ हजार रुपये दंड सुनावला. तसेच फुट ओव्हरब्रीजचा वापर न करता रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या तिघांविरुद्ध रेल्वे अॅक्ट १४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वे न्यायालयाने त्यांना प्रत्येकी २०० रुपये या प्रमाणे ६०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही कारवाई आरपीएफचे निरीक्षक आर. एल. मिना यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक होती लाल मिना आणि जवानांनी पार पाडली. रेल्वे नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलातर्फे वेळोवेळी कारवाई करण्यात येते. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी रेल्वे नियमांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाने केले आहे.
...............