लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्ली, गुजरात छत्तीसगड, हरियाणा या राज्याच्या तुलनेत सर्वाधिक महागडी वीज विदर्भातील जनतेला खरेदी करावी लागत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात विजेचे सर्वाधिक उत्पादन होत असतानाही, सरकार विदर्भातील जनतेवरच अन्याय करीत आहे. या अन्यायाच्या विरोधात आणि महागड्या वीज दराच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटनेने १७ किलोमीटरचा मार्च काढला. पण आंदोलकांचे समाधान न झाल्याने, आक्रमक झालेल्या विदर्भावाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप, राम नेवले, अरुण केदार यांच्या नेतृत्वात संविधान चौकातून भव्य मार्च ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानवर धडकला. बुलडाण्यापासून आमगावपर्यंत विदर्भवादी नेते व कार्यकर्ते या मार्चमध्ये सहभागी झाले होते. १७ किलोमीटरच्या पायी मार्चमध्ये वीज दर कमी करा, विदर्भातील प्रस्तावित वीज प्रकल्प रद्द करा, वेगळा विदर्भ मिळालाच पाहिजे अशा घोषणा आंदोलकांनी केल्या. संविधान चौकातून निघालेल्या मार्चला कोराडी येथील महादुला चौकात थांबविण्यात आले. यावेळी विदर्भवाद्यांनी ऊर्जामंत्र्यांच्या भेटीचा आग्रह धरला. परंतु ते नागपुरात नसल्याने त्यांचे विशेष कार्य अधिकारी शिवराज पडोळे यांच्याशी आंदोलनकर्त्यांची चर्चा झाली. चर्चेमधुन काहीच निष्पन्न न झाल्याने आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. आंदोलकांनी कोराडी चौकात राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. आंदोलकांची आक्रमकता बघून अखेर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. आंदोलनात श्रीनिवास खांदेवाले, रंजना मामर्डे, विजया धोटे, तेजराज चौरे, मुकेश मासुरकर, चंद्रशेखर कुईटे, प्रवीण डांगे, विनायक खोरगडे, अरुण भोसले, मधुसुदन हरणे, विठ्ठल इंगोले, अॅड. अजय चामडिया, पुरुषोत्तम पाटील, सुनील वडस्कर, कृष्णा वानखेडे, दीपक बेले, वसंतराव वैद्य, रवि हटकर, नंदू बेगड, संतोष खाडे, तुळशीराम कोठेकर, देवीदास देशमुख, वीरेंद्र इंगळे, अर्चना भगत, आदींचा समावेश होता.
वीजदराविरोधात विदर्भवाद्यांचा मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 10:25 IST
महागड्या वीज दराच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटनेने १७ किलोमीटरचा मार्च काढला. पण आंदोलकांचे समाधान न झाल्याने, आक्रमक झालेल्या विदर्भावाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
वीजदराविरोधात विदर्भवाद्यांचा मार्च
ठळक मुद्देविदर्भवादी झाले आक्रमक पोलिसांनी घेतले ताब्यात