नागपूर : विदर्भाचा विकास हवा असेल तर प्रत्येकाने आपल्या घरावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकाविला पाहिजे. गेली ५५ वर्षे विदर्भ उपेक्षित, मागासलेला व अनुशेष वाढवित राहिला आहे. महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही. यामुळे वेगळ्या विदर्भासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा तीव्र करणे अपेक्षित आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करीत विदर्भ कनेक्टच्यावतीने अर्थात ‘व्ही कॅन’ने शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता सेंट्रल बाजार रोडवरील विष्णूजी की रसोई येथे विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ यांच्या हस्ते विदर्भाचा झेंडा फडकविला. यावेळी ते बोलत होते. ‘व्ही कॅन’तर्फे विदर्भातील ११ ही जिल्ह्यात एकाचवेळी विदर्भाचा झेंडा फडकवण्यात आला. अॅड. समर्थ म्हणाले, खोटी आश्वासने देऊन राज्यकर्त्यांनी त्यांचे राजकीय हेतू साध्य केले. वैदर्भीयांच्या भावनांचा विचार न करता महाराष्ट्रात समावेश करण्यात आला. मात्र, विकास होणे तर दूर उलट अन्यायच झाला. वेगळ्या राज्याचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी विदर्भ कनेक्ट ही संघटना स्थापन करण्यात आली. वेगळ्या राज्याविना विदर्भाचा आर्थिक, सामाजिक विकास शक्य नाही. आर्थिकदृष्ट्या विदर्भ सक्षम होणार नाही, असे कारण नेहमीच समोर करण्यात येते. त्याला प्रत्युत्तर म्हणून वैदर्भीय साधनसंपन्नता दर्शवणारा पंचरंगी झेंडा तयार करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, विदर्भ जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, वेदचे सचिव राहूल उपगन्लावार, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे समन्वयक दीपक निलावार, जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, प्रवीण महाजन, ललित खुल्लर, सारंग उपगन्लावार, ए.के. गांधी, माजी पोलीस महासंचालक पी.के.बी. चक्र वती, जयंती पटेल, विदर्भ कनेक्टचे सचिव दिनेश नायडू, तेजिंदरसिंग रेणू, सुधीर पालीवाल, संदेश सिंगलकर, तुषार मंडलेकर, समीर फाले, चंद्रगुप्त समर्थ, अक्षय सुदामे व इतर मान्यवर उपस्थित होते. सिंदखेडराजा येथे मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता व विदर्भ कनेक्टचे संरक्षक श्रीहरी अणे यानी झेंडा फडकवला. त्यासोबतच महाराष्ट्र दिन काळा दिन म्हणून पाळण्यात आला. (प्रतिनिधी)
महाराष्ट्रात विदर्भाचा विकास अशक्य
By admin | Updated: May 2, 2015 02:20 IST