लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : वेकाेलि प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून गुरुवारी (दि. ७) वेकाेलि परिसरात ‘रास्ता राेकाे’ आंदाेलन करीत काेळशाच्या वाहतुकीचे ट्रक अडविले हाेते. त्यानंतर याच प्रकल्पग्रस्तांनी धरणे आंदाेलन सुरू केले असून, शनिवारी (दि. ९) या आंदाेलनाचा दुसरा दिवस हाेता.
गाेंडेगावच्या पुनर्वसनाचा प्रश्न २४ वर्षांपासून साेडविला जात नाही. शिवाय, स्थानिकांना राेजगार दिला जात असून, खाणीतील स्फाेटांमुळे घरांना हादरे बसत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी गुरुवारी ‘रास्ता राेकाे’ आंदाेलन केले. यात त्यांनी काेळशाच्या वाहतुकीचे ट्रक अडविले हाेते. शिवाय, वेकाेलिने विना परवानगी सुरू केलेल्या अंडरपासच्या निर्मितीचे काम बंद पाडले. त्यानंतर याच प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत धरणे आंदाेलन करायला सुरुवात केली.
या आंदाेलनात माजी आमदार एस. क्यू. जमा, जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, कन्हानच्या नगराध्यक्ष करुणा आष्टनकर, नरेश बर्वे, सिन्नू विनयवार, पंचायत समिती सभापती मीना कावडे, करुणा भोवते, टेकाडीच्या सरपंच सुनीता मेश्राम, कांद्रीचे सरपंच बलवंत पडोले, गोंडेगावचे सरपंच नीतेश राऊत, वराडाच्या सरपंच विद्या चिखले, घाटरोहणाच्या सरपंच मीनाक्षी बेहुने, उपसरपंच श्यामकुमार बर्वे, सुभाष डोकरीमारे, प्रमोद कावडे, पप्पू जमा, धनंजय सिंह, कमलेश गोस्वामी, रणजित सिंह, साहिल गजभिये, पृथ्वीराज मेश्राम, मनीष भिवगडे, धनराज कारेमोरे, प्रकाश चापले, राहुल टेकाम, महेश झोडावणे, ज्ञानेश्वर आकरे, ललिता पहाडे, कुणाल मधुमटके, आकाश कोडवते, जाहीद हुसेन यांच्यासह घाटरोहणा, कांद्री, गोंडेगाव, वराडा, कन्हान येथील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले हाेते.
....
गाेंडेगावचे पुनर्वसन कधी?
गाेंडेगावच्या पुनर्वसनाची समस्या २४ वर्षांपासून साेडविण्यात आली नाही. त्यामुळे या गावाच्या पुनर्वसनासाेबतच स्थानिक तरुणांना वेकाेलित राेजगार देणे, वेकाेलिने खाेदलेल्या खड्ड्यांमध्ये नागरिकांचा मृत्यू हाेत असल्याने ते बुजविण्यात यावे. खाणीतील स्फाेटांमुळे नागरिकांच्या हाेत असलेल्या गैरसाेयी दूर कराव्या. नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी. धुळीमुळे पिकांचे नुकसान हाेत असल्याने ही समस्या कायमस्वरूपी साेडवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, यासह १० मागण्यांसाठी आंदाेलन केले जात असल्याची माहिती नरेश बर्वे यांनी दिली.