नागपूर : लसीचा वारंवार पडत असलेला तुटवडा यामुळे लसीकरण केंद्रावर उसळणारी गर्दी, यातून संभाव्य कोरोनाचा धोका या धास्तीने खासगी केंद्रावर पैसे देऊन लस घेण्याचे प्रमाण वाढले आहे. नागपुरात जवळपास ८२ हजार ५०० नागरिकांनी लसीकरणासाठी खासगी केंद्राला पसंत केले आहे.
नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास ४२ लाख ३० हजाराच्यावर गेली आहे. जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात आतापर्यंत १२,६७,५४० लोकांनी पहिला डोस घेतला आहे. याची टक्केवारी २९.८६ टक्के आहे. परंतु त्यातुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ ४,०३,८१३ आहे. ही टक्केवारी केवळ ९.५४ टक्के आहे. थंडावलेल्या लसीकरणामागे लसीचा तुटवडा हे महत्त्वाचे कारण आहे. प्रशासनाला लसीचा साठा उपलब्ध झाल्यावर सर्वच केंद्रावर गर्दी उसळते. कोरोना संसर्गाचा धोकाही संभवतो. त्यामुळे खासगी रुग्णालयात पैसे देऊन लस टोचून घेण्याकडे लोकांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.
-लसीकरणासाठी जाऊन कोरोना आणणे परवडत नाही
मनपाच्या व शासकीय रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर लस कधी उपलब्ध होईल, ही शाश्वती नाही. लस उपलब्ध झाल्यावर सर्वच केंद्रावर गर्दी उसळते. या गर्दीला नियंत्रण करण्याची विशेष यंत्रणा नाही. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होत नाही. यामुळे अशा केंद्रांवर लसीकरणासाठी जाऊन कोरोना आणणे परवडत नसल्याने खासगीमध्ये लस घेतली.
-मनीष वझलवार, संचालक वझलवार ड्रायव्हिंग स्कूल
-खासगीमध्ये सोयींकडे विशेष लक्ष
खासगी रुग्णालयात पैसे देऊन लस घेणाऱ्यांकडे व तेथील सोयींकडे विशेष लक्ष दिले जाते. ‘को-विन अॅपवर’ किंवा ‘ऑफलाईन’वर ही नोंदणी होते. दिलेल्या वेळेत पोहोचल्यास १० मिनिटात लस दिली जाते. विशेष म्हणजे, खासगीमध्येही १८ ते ४४ या वयोगटासाठी लसीकरण खुले करण्यात आल्याने याचा फायदा होत आहे.
-स्नेहल मून, आयटी कंपनी
शासकीय रुग्णालयात का नाही?
:: लसीचा तुटवडा
:: शासकीय लसीकरण केंद्रावर उसळत असलेली गर्दी
:: ‘को-विन’ शअॅपवर नोंदणी केलेल्यांची व ‘ऑफलाईन’ॲपवर नोंदणीसाठी एकच असलेली रांग.
:: महिला व वृद्धांसाठी वेगळी सोय नाही
:: रांगेत लागल्यावरही लस मिळेलच, याची शाश्वती नाही
:: केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे विशेष पालन होत नाही
:: ओळखीच्या लोकांना प्राधान्य दिले जाते.
:: पाणी, स्वच्छतागृहाचा अभाव
:: आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस घेतलेल्यांची संख्या : १२,६७,५४०
दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या : ४,०३,८१३
:: खासगी रुग्णालयातील आकडे काय सांगतात
:: न्यू ईरा हॉस्पिटल : २२,०००
:: किंग्जवे हॉस्पिटल : २५,०००
:: वोक्हार्ट हॉस्पिटल : २३,५००
:: केअर हॉस्पिटल : १२,०००