लोकमत न्यूज नेटवर्क
कुही : काेराेना प्रतिबंधित लसींचा पुरवठा बंद झाला आहे. शनिवारी केवळ ४८७ डाेस शिल्लक असल्याने कुही, मांढळ व तितूर येथील केंद्रांवर लसीकरण सुरू हाेते. कुही येथे ९७ तर तितूर येथे ४३ अशा एकूण २३७ नागरिकांना लस देण्यात आली. आता केवळ तितूर व कुही येथे प्रत्येकी १०० व मांढळ येथे ५० डोस शिल्लक आहेत. त्यामुळे इतर केंद्रांप्रमाणे कुही तालुक्यातील लसीकरण केंद्रही लसीच्या तुटवड्यामुळे बंद पडणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या काेराेनाचा प्रकाेप वाढला आहे. काेराेनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व उपचारार्थ हाेणारा खर्च पाहता सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. काेराेनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. परंतु लस संपल्यामुळे यापूर्वीच तारणा, वेलतूर, जीवनापूर, साळवा व डाेंगरगाव येथील लसीकरण केंद्र बंद पडले. शुक्रवारी जीवनापूर केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागते. सुरुवातीला लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी गावागावात जनजागृती करण्यात आली. स्थानिक पदाधिकारी, लाेकप्रतिनिधींसह, शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर आदींनी घराेघरी जाऊन नागरिकांना लसीकरणासाठी प्राेत्साहित केले. गैरसमज दूर झाल्यानंतर नागरिकही लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. परंतु सध्या लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत ६० टक्के लसीकरण झाले. आता केवळ २५० डाेस शिल्लक आहे. त्यामुळे कुही तालुक्यातील सर्वच लसीकरण केंद्र साेमवारपासून बंद हाेण्याची शक्यता आहे. यामुळे लाेकप्रतिनिधी व प्रशासनाने जास्तीत जास्त लस उपलब्ध करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.