लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात उद्या १६ जानेवारी रोजी होणाऱ्या कोविड लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. नागपूर जिल्ह्यासाठी ४२ हजार कोरोना डोस उपलब्ध झाले आहेत. ३६ हजार १४५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. पहिल्या टप्प्यात लस घेणाऱ्यांनाच चार आठवड्यांनंतर लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे नागपूर शहरातील १० हजार तर ग्रामीण मधील ७ हजार ८०० अशा एकूण १७ हजार ८०० आरोग्य कर्मचाऱ्यांनाच ही लस दिली जाणार आहे. पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटची ही व्हॅक्सिन असून, ती डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, रुग्णालयांचे इतर कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर या आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. हे शहरातील केंद्रांना उद्या स्वत: भेट देतील.
बॉक्स....
येथे होणार लसीकरण
शहर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डागा रुग्णालय, एम्स आणि मनपाचे पाचपावली सुतिकागृह
ग्रामीण
उपजिल्हा रुग्णालय रामटेक व कामठी, ग्रामीण रुग्णालय उमरेड, हिंगणा, काटोल, सावनेर, प्राथमिक आरोग्य केंद्र, गोंडखैरी
बॉक्स....
शहरातील केंद्रात दररोज १०० जणांना लसी
अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, मनपातर्फे प्रत्येक केंद्रावर दररोज १०० आरोग्यसेवकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर मनपाचे ४ आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी तैनात राहतील.
बॉक्स....
लसीकरणानंतर अर्धा तास निरीक्षण कक्षात थांबावे लागणार
लसीकरण केंद्रात लस लावण्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या नावाची तपासणी केली जाईल. त्यानंतर, त्यांचे तापमान घेऊन सॅनिटाइझ करून प्रतीक्षागृहात त्यांच्या बसण्याची व्यवस्था केली जाईल. लसीकरण करण्यापूर्वी त्यांची ओळख पटविल्यानंतर कोविड पोर्टलवर त्यांच्या नावाची नोंदणी केली जाईल. लसीकरण केल्यानंतर त्यांना अर्धा तास निरीक्षण कक्षामध्ये बसावे लागेल.
बॉक्स....
ऐच्छिक व नि:शुल्क लस
‘कोव्हिन’ ॲपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असली, तरी ती बंधनकारक करण्यात आलेली नाही. लस ही ऐच्छिक आहे. विशेष म्हणजे लस पूर्णत: नि:शुल्क आहे. या सर्व केंद्रांवरही नि:शुल्क लस देण्यात येणार आहे.