मोवाड : मोवाड शहरात कोरोना संक्रमणाचा ग्राफ वाढतोय. नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र व नगरपालिका प्रशासनतर्फे वारंवार करण्यात येत आहे. मोवाड येथे ४५ वर्षांवरील २६०० नागरिक आहेत. सोमवारपर्यंत १७२८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संजय सोळंके यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लसीकरण हाच पर्याय आहे. त्यासाठी ४५ वर्षांवरील नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन सोळंके यांनी केले. सध्या मोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरू आहे. लसीकरणाबाबत नागरिकांनी कोणतेही गैरसमज बाळगू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सोमवारी मोवाड शहरात पाच रुग्णांची भर झाली. सध्या शहरात ३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मोवाड येथील कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट ९० टक्के इतका आहे. त्यामुळे मोवाड शहर कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी लसीकरणासह प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.