नागपूर : महापालिकेतर्फे शुक्रवारी पाचपावली सूतिकागृह येथे गरोदर व स्तनदा मातांच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. याशिवाय डागा रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे सुद्धा लवकरच गरोदर व स्तनदा मातांचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
गर्भवती मातांना लस द्यावी अथवा नाही याबाबत संभ्रमाची स्थिती होती. यापूर्वी केंद्र शासनानेही त्यासंदर्भात आवश्यक निर्देश दिले नव्हते. मात्र २ जुलै २०२१ रोजी केंद्र शासनाद्वारे यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. त्यानुसार नागपूर महानगरपालिका प्रशासनाद्वारे ही सुविधा करण्यात आली. जास्तीत जास्त गर्भवती व स्तनदा मातांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व लवकरात लवकर आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी केले आहे.
दरम्यान, राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण महापालिकेसह शासकीय असलेल्या १४५ केन्द्रावर शनिवारी होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. त्यांचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ४ पर्यंत केल्या जाईल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. सध्या नागपूर महानगरपालिका आणि अन्य शासकीय केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
१८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशीनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे.