नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढविण्यासाठी २४ तास लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु धुळवडीच्या दिवशी, २९ मार्च रोजी महानगरपालिकेचे लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली. त्याऐवजी रविवार, २८ मार्च रोजी सर्व केंद्रे सकाळी ९ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील. विशेष म्हणजे, शहरात शनिवारी कमी लसीकरण झाले.
शहरात रोज २० हजारावर लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना शनिवारी ७७ केंद्रांवरून ६,९८९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यात पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ६,६३९ तर, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३५० होती. पहिल्या डोस घेणाऱ्यांमध्ये ७७७ हेल्थ वर्कर, १,२२७ फ्रंट लाइन वर्कर, १२३९ गंभीर आजार असलेले ४५ वर्षांवरील लाभार्थी तर ३,३९६ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. सूत्रानुसार, लसीचा साठा कमी असल्याने आज सर्वच केंद्रांवर १०० व त्यापेक्षा कमी डोस देण्याच्या सूचना होत्या. यामुळे सायंकाळनंतर अनेकांना रविवारी येण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे.