महिला सामाजिक कार्यकर्त्यांचे आवाहन : अत्यल्प उमेदवारी दिल्याचा निषेधनागपूर : एकीकडे सर्वच राजकीय पक्षांकडून महिला सक्षमीकरणासंदर्भात मोठमोठी आश्वासने देण्यात येतात. परंतु प्रत्यक्ष निवडणुकांच्या वेळी मात्र बोटावर मोजण्याइतपत महिलांना उमेदवारी देण्यात आल्याचा विदर्भ व उपराजधानीतील महिला सामाजिक कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला आहे. महिलांनी केवळ महिला उमेदवारांनाच मतदान करावे. जिथे महिला उमेदवार नाहीत, तेथे तर ‘नोटा’चाच वापर करावा असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले. आकांक्षा प्रकाशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चर्चेत हा संताप व्यक्त झाला.वनराईच्या कार्यालयात झालेल्या या चर्चासत्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सीमा साखरे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी माया वानखडे, नयना धवड, अरुणा सबाने यांचादेखील प्रमुख सहभाग होता. महाराष्ट्रातील महिलांनी आपले कर्तृत्व वेळोवेळी सिद्ध केले आहे. परंतु राजकारणात मात्र अजूनही महिलांना योग्य ती संधी मिळालीच नाही. राजकीय नेत्यांना अजूनही महिलांची कार्यक्षमता व कर्तृत्वावर विश्वासच नाही. त्यांच्या डोळ््यावरील गैरसमजाने भरलेल्या विचारांचा चष्मा अजूनही उतरलेलाच नाही. निवडणुकांच्या काळात गटातटाचे राजकारण रंगते, सत्ता आली नसली तरी मुख्यमंत्रिपदाची चर्चा रंगते परंतु महिलांच्या उमेदवारीच्या कमी टक्क्याबाबत मात्र सर्वच पक्षांकडून मौन ठेवण्यात येते. ही बाब पुरोगामी महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे असे मत सीमा साखरे यांनी व्यक्त केले. केवळ राजकारण्यांना दोष न देता ज्या महिलांना आतापर्यंत राजकारणात संधी मिळाली त्यांनी महिला सक्षमीकरणाचे किती प्रयत्न केले या मुद्यावरदेखील विचार व्हायला हवा असा मुद्दा नयना धवड यांनी मांडला. सामाजिक क्षेत्रात चांगले काम करूनदेखील निवडणुकांच्या वेळी महिलांना उमेदवारी नाकारली जाते. त्यामुळे आता ‘एक स्त्री, एक मत’ हेच आमचे धोरण असेल असे अरुणा सबाने यांनी सांगितले. मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील १३ पैकी ७ जागांवर महिला उमेदवार असून राजकीय पक्षांना आता महिलाशक्ती काय असते हे दाखविण्याची वेळ आली असल्याचे मत माया वानखडे यांनी व्यक्त केले.(प्रतिनिधी)
महिला उमेदवार नाहीत, ‘नोटा’ वापरा!
By admin | Updated: October 7, 2014 00:55 IST