लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : शहरी नक्षलवादाच्या अड्डयांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार विशेष कायदा करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत या 'महाराष्ट्र विशेष संदर्भातील जनसुरक्षा विधेयक २०२४' सादर केले. जुलैमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ते मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
मुख्यमंत्री विधेयक सादर करताना म्हणाले, नक्षलवादाला तोंड देण्यासाठी राज्यात कोणताही स्पष्ट कायदा नाही. अशा परिस्थितीत शहरी नक्षलवाद्यांवर कारवाई करताना केंद्र सरकारच्या आयपीसी किंवा यूएपीए कायद्याचा वापर केला जातो. मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यावर वाद निर्माण होतात. यूएपीएची निर्मिती दहशतवादासाठी करण्यात आल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे नक्षलवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये ते लागू होऊ शकत नाही. यामुळे नक्षलग्रस्त छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांनी शहरी नक्षलवाद्यांशी सामना करण्यासाठी विशेष कायदे केले आहेत.
संयुक्त समितीकडे विधेयक पाठवणार
फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात नक्षलवादविरोधी पथकाकडून असा कायदा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या कायद्याबाबत अनेक संघटना आणि काही लोकप्रतिनिधींमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सरकार स्वतःच्या वतीने हे विधेयक विधिमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे, त्यावेळी संघटनांनाही आपले म्हणणे मांडता येईल. चांगले काम करणाऱ्या संस्थांनी या कायद्याला घाबरण्याची गरज नाही.