नागपूरच्या इतिहासात अभूतपूर्व म्हणावे असे स्वागत देवेंद्र फडणवीस यांच्या वाट्याला आले. या स्वागताने खुद्द देवेंद्रही भारावून गेले. विदर्भाचे चौथे, नागपूरचे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मुंबईत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात शपथ घेतल्यानंतर रविवारी ठीक ४.३५ वाजता देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेर प्रतीक्षेत असलेल्या हजारो भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. काळी पॅन्ट, पांढरा शर्ट आणि त्यावर आकाशी रंगाचे जॅकेट परिधान केलेले देवेंद्र फडणवीस सजविलेल्या रथावर (ट्रक) सपत्निक स्वार होताच जल्लोष अधिकच वाढला. प्रसन्न मुद्रेने आणि तेवढ्याच विनम्रतेने गर्दीत असलेल्या हजारो परिचित चेहऱ्यांना कधी हात दाखवत तर कधी हात जोडत देवेंद्र स्वागताचा स्वीकार करीत होते.आपुलकी अन् जिव्हाळा मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे कुणाला निमंत्रण नव्हते, गर्दी जमविण्यासाठी वाहनांची व्यवस्था नव्हती. स्वयंस्फूर्तीने लोकं आले. कुणाच्या हातात पुष्पगुच्छ, तर कुणाच्या हातात हार, कुणाच्या हाती भाजपचा झेंडा. स्वागतासाठी आलेल्या गर्दीत शाळकरी मुलांपासून महाविद्यालयीन तरुणांपर्यंत, गृहिणींपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचाच समावेश होता. परवा पर्यंत देवेंद्रला एकेरी नावाने हाक मारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या लाडक्या देवेंद्रला ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पाहायचे होते. या सर्वांच्याच देहबोलीत आपुलकी होती आणि त्यांच्या स्वागतात जिव्हाळा आणि जल्लोषही होता. गर्दीमुळे अनेकांच्या हातातील पुष्पगुच्छ, हार देवेंद्र यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाहीत. पण त्याबाबत कोणालाही खंत नव्हती. मात्र फडणवीस यांना डोळे भरून पाहिल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकताना दिसला. हातातच राहून गेलेल्या फुलांना तेज आल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर होते. नागरिकांनी केली पुष्पवृष्टीरथाच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची वेशभूषा केलेल्या कलावंतांचे वाहन होते. गर्दीतून वाट काढत रथ पुढच्या मार्गक्रमणाला लागला तेव्हा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मार्गात अनेक ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. फटाके फोडण्यात आले. ढोलताशांच्या निनादात भाजप व फडणवीस यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या जात होता. एकूणच विमानतळ तर वर्धा रोड आणि पुढच्या टप्प्यावरील वातावरण भाजमपय झालेले दिसून आले. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी तसेच पुढच्या मार्गावरही लोकांनी गर्दी केली होती. इमारतींवर लोक उभे होते. प्रत्येक जण त्यांच्या हातातील मोबाईलमध्ये फडणवीस यांना कैद करण्याचा प्रयत्न करीत होता. विशेष म्हणजे महिलांची संख्या लक्षणीय होती. पारंपरिक पोशाखात आलेल्या काही महिलांनी भगवे फेटे परिधान केले होते. त्यामुळे सर्व गर्दीत त्या उठून दिसत होत्या. सोमलवाडा परिसरातील नागरिकांनी फडणवीस यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी जय्यत तयारी केली होती. पण गर्दीमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी स्वागतासाठी आलेल्या नागरिकांवरच फुले उधळली. चार तासाचे मार्गक्रमण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मुख्यमंत्र्यांचे धरमपेठ त्रिकोणी पार्क येथील निवासस्थान हा टप्पा गाठण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुमारे ४ तासाचा वेळ लागला. यावरून त्यांच्या स्वागतासाठी उसळलेल्या गर्दीचा अंदाज यावा. दुपारी ४.३० वाजता मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर लगेचच स्वागत मिरवणुकीला सुरुवात झाली. हेडगेवार स्मारक, सोमलवाडा चौक, छत्रपती चौक, सावरकर चौक, दीक्षाभूमी असा टप्पा पार करीत फडणवीस यांची स्वागत मिरवणूक त्यांच्या निवासस्थानी रात्री ८.३० वाजता पोहोचली निवासस्थानी पोहोचली. फडणवीस यांच्या स्वागत रथावर त्यांच्या पत्नी अमृता, भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, पक्षाचे शहर अध्यक्ष व आमदार कृष्णा खोपडे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष देशमुख, बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे यांच्यासह इतरही भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. डॉ. हेडगेवार यांच्या स्मारकास अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम विमानतळाबाहेरील हॉटेल प्राईड समोरील डॉ. हेडगेवार चौक स्मारकास पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले. सायंकाळी ५ वाजता ते येथे आले. तत्पूर्वी हजारो कार्यकर्ते व नागरिक त्यांच्या स्वागतासाठी प्रतीक्षा करीत उभे होते. ढोलताशाच्या गजरात मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वागत करण्यात आले. मुलींनी लेझिम नृृत्य केले. ‘मल्हार’ या तरुणाईच्या ग्रूपने ढोलताशांच्या गजरात स्वागत गीत सादर केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फेसुद्धा येथे मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. ं दीक्षाभूमीवर नमन...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रथमच नागपुरात आगमन झाल्यानंतर सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ते दीक्षाभूमीला पोहोचले. दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच स्मारकाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना दीक्षाभूमी स्तुपाचे तैलचित्र भेट देण्यात आले. यावेळी स्मारक समितीचे सदस्य भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई, डॉ. राजेंद्र गवई, आनंद फुलझेले, विलास गजघाटे, सुधीर फुलझेले, विजय चिकाटे, एन.आर. सुटे यांच्यासह महापौर प्रवीण दटके, आ. डॉ. मिलिंद माने, आ. प्रकाश गजभिये, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, आ. नाना शामकुळे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, राजन वाघमारे, शेखर गोडबोले, अविनाश धमगाये, संघपाल उपरे, प्रमोद तभाणे, संदीप गवई आदी उपस्थित होते.
अभूतपूर्व
By admin | Updated: November 3, 2014 00:45 IST