सुरक्षेत वाढ : ठिकठिकाणी बंदुकधारी पोलीस तैनातनागपूर : याकूब मेमनला गुरुवारी सकाळी फाशी देण्यात येत असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एके ४७ आणि इतर आधुनिक शस्त्र घेऊन ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर आणि बॅग स्कॅनरमध्ये सामानाची तपासणी करूनच आत सोडण्यात येत आहे. श्वानपथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने रेल्वेस्थानकावर कसून तपासणी चालविली आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांना सावधानता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा हे परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. लोहमार्ग पोलिसांशी समन्वय साधून रेल्वेस्थानकावर तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लोहमार्ग पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकासह आरपीएफच्या श्वानपथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आरपीएफ जवानांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. लोहापूल परिसर, कामठी रोडवरील गुरुद्वारा परिसर, आऊटर साईडकडे दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अजनी रेल्वेस्थानकावरही सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय पान्हेकर यांनी मुख्यालयातून क्विक रिस्पॉन्स टीम आणि ठाण्यातील जवान तैनात करण्यात आल्याचे सांगितले. याशिवाय रात्री वरिष्ठ अधिकारी रेल्वेस्थानकाची पाहणी करणार आहेत. गुरुवारी बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात येणार असून ५० ते ६० जवानांना तैनात करण्यात येणार आहे. नक्षल सप्ताह सुरू असल्यामुळे ही सुरक्षा व्यवस्था आणखी काही दिवस राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस व्हेंडर, रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आहेत. (प्रतिनिधी)
रेल्वेस्थानकावर अभूतपूर्व बंदोबस्त
By admin | Updated: July 30, 2015 03:03 IST