बेला : चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित माेटरसायकल पुलावरून खाली काेसळली. यात एकाचा मृत्यू झाला तर दाेघे गंभीर जखमी झाले. ही घटना बेला (ता. उमरेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खातखेडा शिवारात घडली.
रितिक ईश्वर बावणे (२०) असे मृताचे तर आशिष कृष्णाजी शेंडे व आकाश पराते, अशी जखमींची नावे आहेत. तिघेही मित्र असून, बेला येथील रहिवासी आहेत. ते एमएच-४०/बीटी-८६४२ क्रमांकाच्या माेटरसायकलने ट्रिपल सीट बेल्याच्या दिशेने येत हाेते. रितिक माेटरसायकल चालवीत हाेता तर दाेघे मागे बसले हाेते. दरम्यान, खातखेडा शिवारातील पुलावर चालकाचा अनियंत्रित दुचाकीवरील ताबा सुटला आणि माेटरसायकल पुलावरून खाली काेसळली. यात तिघांनाही गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून बेला येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती रितिकला मृत घाेषित केले तर, अन्य दाेघांवर प्रथमाेपचार करून त्यांंना नागपूरला भरती करण्याची व्यवस्था केली. याप्रकरणी बेला पाेलिसांनी दुचाकीचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक ठेंगणे करीत आहेत.