नरेश डोंगरे नागपूरघातक शस्त्राची बिनबोभाट तस्करी होत असताना सुरक्षा यंत्रणांना त्याची कल्पनाच नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मोमीनपुऱ्यात सापडलेल्या घातक शस्त्राच्या साठ्यातून सुरक्षा यंत्रणांचा गाफिलपणा अधोरेखित झाला असतानाच आरपीएफ आणि जीआरपीच्या डोळ्यातही झणझणीत अंजन पडले आहे. मोहम्मद नईम जैजूल आबेदिन अन्सारी (वय ४९) याच्या मोमीनपुऱ्यातील जनरल स्टोर्समध्ये धाड घालून तहसील पोलिसांनी तलवार, चाकू, चॉपर, गुप्ती, कुकरी अशी एकूण १०२ शस्त्रे जप्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त करण्याची ही गेल्या दहा वर्षातील पहिलीच कारवाई आहे. कुणाच्याही मनात धडकी भरावी, अशी ही घातक शस्त्रे ‘अत्याधुनिक‘ आहेत. चॉपर अन् चाकूवर तर चक्क लाईट लागलेला आहे. काहींवर एके ४७ असे लिहिले आहे. त्याचा उलगडा करताना एके ४७ (रिव्हॉल्व्हर) ज्या तीव्रतेने समोरच्याचा वेध घेते, तितक्याच तीव्रतेने समोरच्या व्यक्तीचा जीव धोक्यात आणणारी ही शस्त्रे असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात. चिनी (चायना) बनावटीची ही शस्त्रे नागपूरपर्यंत कशी पोहचतात, त्याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती धक्कादायक आहे. भेंडीबाजार मेन सेंटरसागरी मार्गाने ही शस्त्रे मुंबईत पोहचतात. भेंडी बाजारात त्याचे मेन सेंटर आहे. नागपूरसह ठिकठिकाणच्या कुख्यात गुंडांना आणि शस्त्र विक्रेत्यांना ‘आॅन डिमांड‘ ही शस्त्रे पुरविली जातात. सर्वाधिक शस्त्रे कर्नाटक आणि आंध्रात पोहचतात. त्यापाठोपाठ या शस्त्रांना तामिळनाडू आणि महाराष्ट्रात मागणी असल्याची सूत्रांची माहिती आहे. जवळपासच्या ठिकाणी शस्त्रे पाठविण्यासाठी छोटी मोठी वाहने वापरली जातात. दूरच्या ठिकाणावर शस्त्र तस्करीसाठी रेल्वेचा उपयोग करून घेतला जातो. ठिकठिकाणच्या मालधक्क्यावर ही शस्त्रे वेगवेगळ्या चिजवस्तूच्या बॉक्समध्ये बेमालूमपणे लपवून पाठविली जातात. (अन्सारीकडे येणारी शस्त्रे सौंदर्य प्रसाधनाच्या बॉक्समध्ये येत होती. ) मालधक्क्यावर पावती फाडली की शस्त्राचा बॉक्स संबंधिताच्या बिनबोभाट दुकानात किंवा घरी पोहचतो. नंतर तो समाजकंटकाच्या हातात जातो. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू असल्याची माहितीही सूत्रांकडून सांगितली जाते.
शस्त्र तस्करीपासून सुरक्षा यंत्रणा अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2015 02:20 IST