उमरेड : शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाने चांगलेच तोंड वर केले आहे. तालुक्यात रुग्णसंख्या वाढतीवर आहे. कोविड केअर सेंटरमध्ये जागा मिळणे कठीण झाले आहे. कोविड टेस्टसाठीसुद्धा तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. औषधोपचारासाठी अक्षरश: हाल बेहाल होत आहेत. अशा अत्यंत विपरीत परिस्थितीतही नागरिकांची विनाकारण गर्दी सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याबाबत अनेकांच्या तक्रारी समोर येताच आता उमरेड पोलीस अॅक्शन मोडवर आल्याचे चित्र दिसून येत आहे.
गुरुवारी सकाळच्या सुमारास उमरेडचे उपविभागीय पाेलीस अधिकारी भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या नेतृत्वात पथसंचलन करण्यात आले. यावेळी नियमांचा भंग केल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल. कुणाचीही हयगय केली जाणार नाही, अशा सूचनाही देण्यात आल्या. बंद असलेल्या दुकानांसमोर उभे राहू नये. दुकानासमोर बसू नये, अशा सूचना नगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
....
दुकानदार बाहेर, ग्राहक आत
मागील काही दिवसापासून इतवारी मुख्य बाजार ओळीतील काही दुकानदार दुकानाच्या बाहेर उभे राहून दुकानाच्या आत ग्राहकांना पाठवून खुलेआम व्यवसाय करीत असल्याच्या गंभीर बाबी समोर येत आहेत. याबाबत उमरेड तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीकडे तक्रारी गेल्या आहेत. असे असतानाही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दुकानदार दुकानाच्या बाहेर आणि ग्राहक आत अशा संपूर्ण प्रकारामुळे बाजारात चांगलीच गर्दी होत आहे. यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.