उमरेड : आराेग्यसेवा वगळता इतर दुकाने व प्रतिष्ठाने रविवारपासून (दि.१८ ते २५ एप्रिलपर्यंत) बंद राहणार आहेत. किराणा व्यापारी, भाजीपाला विक्रेते आणि कृषी सेवा केंद्रचालकांनी यासाठी पुढाकार घेतला असून, उमरेड येथे आठवडाभर कडकडीत बंद पाळला जाणार आहे.
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या रिकामटेकड्यांच्या मुसक्या बांधणार असून, दंडात्मक कारवाईसह नियमावलीचा भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास पोलीस यंत्रणा मागेपुढे बघणार नाही, असा इशारा पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी दिला आहे. वैद्यकीय कारणांशिवाय कुणीही बाहेर पडू नये, असे आवाहन केले जात आहे. रविवारपासून आठवडाभर बाजारपेठ बंद असल्याच्या कारणावरून शनिवारी सकाळपासूनच बाजारात गर्दी उसळली. चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. रविवारपासून चौकाचौकात पोलीस यंत्रणा तैनात राहणार असून, नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया यांनी केले आहे.