लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : भरधाव कंटेनरने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्यांची पत्नी किरकाेळ जखमी झाली. अपघाताची ही घटना काेंढाळीनजीकच्या चाकडाेह शिवारात गुरुवारी (दि.१८) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
नामदेव लक्ष्मण भादे (५५, रा. त्रिमूर्तीनगर, पन्नासे ले-आऊट, नागपूर) असे मृताचे नाव असून, त्यांची पत्नी रेखा भादे (५०) या किरकाेळ जखमी झाल्या. नामदेव भादे हे पत्नी रेखासह एमएच-३१/ईसी-५१४६ क्रमांकाच्या दुचाकीने त्यांच्या मूळगावी काेंढाळी-अमरावती मार्गावरील सावळी (खुर्द) ता. कारंजा, जि. वर्धा येथे जात हाेते. अशात दुपारी १.३० वाजताच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाल्याने भादे हे चाकडाेह बसथांबा येथे आडाेशाला थांबले हाेते. पाऊस थांबल्यानंतर ते पुन्हा दुचाकीने काेंढाळीकडे जात हाेते. दरम्यान, चाकडाेह टी-पाॅईंटकडून वळण घेताना नागपूरकडून भरधाव येणाऱ्या एचआर-३८/एक्स-७७७६ क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात पती-पत्नी दाेघेही राेडवर फेकल्या गेले. यात नामदेव भादे यांना गंभीररीत्या दुखापत झाली तर त्यांची पत्नी किरकाेळ जखमी झाली.
घटनेची माहिती मिळताच काेंढाळी पाेलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णवाहिकेने वाडी नागपूर येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान नामदेव भादे यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक वाहन साेडून पसार झाला. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक देवेंद्र साेनावले करीत आहेत.