लाेकमत न्यूज नेटवर्क
धामणा : भरधाव कंटेनरने माेटरसायकलला मागून जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा परिसरात गुरुवारी (दि. ११) रात्री १०.२५ वाजताच्या सुमारास घडली.
शुभम रंगराव पाटभाये (२१) असे मृताचे तर विकास राजू पवार (२१) असे गंभीर जखमीचे नाव आहे. दाेघेही मित्र असून, ते माेझरी (गुरुकुंज), ता. तिवसा, जिल्हा अमरावती येथील रहिवासी आहेत. दाेघेही एमएच-३७/यू-८९३५ क्रमांकाच्या माेटरसायकलने नागपूरहून काेंढाळी, कारंजा(घाडगे)मार्गे माेझरीला जात हाेते. दरम्यान, धामणा परिसरात मागून वेगात येणाऱ्या एमएच-४०/बीएल-७९७६ क्रमांकाच्या कंटेनरने बायपास राेडवर वळताना त्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली.
या धडकेमुळे माेटरसायकल थेट दुभाजकावर आदळली. यावरून धडकेतीची तीव्रता लक्षात येते. यात दाेघांनाही गंभीर दुखापत झाली. मात्र, शुभमच्या डाेक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा काही वेळात घटनास्थळीच मृत्यू झाला. विकासच्या हात व पायाला इजा झाली. धडक देताच चालकाने कंटेनर साेडून घटनास्थळाहून पळ काढला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी शुभमचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तर विकासला उपचारासाठी नागपूरला शासकीय रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, तपास सहायक फाैजदार पवार व विशाल तोडासे करीत आहेत.