वाडी : भरधाव ट्रेलरने माेटारसायकलला मागून जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना वाडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील टी पाॅईंटजवळ शनिवारी (दि. १३) सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. हा आठवडाभरातील दुसरा अपघात हाेय.
सचिन रामभाऊ गुबे (वय ३८, रा. आदर्शनगर, वाडी) असे मृताचे नाव आहे. सचिन एमआयडीसी परिसरातील कंपनीत मशिनीस्टपदी काम करायचा. ताे शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे एमएच-४०/९२२२ क्रमांकाच्या माेटारसायकलने कामावर जात हाेता. दरम्यान, टी पाॅईंटजवळ काटाेल बायपासहून आलेल्या एनएल-११/०४२४ क्रमांकाच्या ट्रेलरने माेटारसायकलला मागून जाेरात धडक दिली. यात माेटारसायकल ट्रेलरमध्ये अडकल्याने काही दूर घासत गेली. शिवाय, गंभीर दुखापत झाल्याने सचिनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सुनील मस्के करीत आहेत.