नागपूर : जरीपटका आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्ही आरोपी फरार झाले.मेकोसाबागेतील वंदना सोमनाथ चौधरी (वय २८) या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. गुरुवारी दुपारी ४ वाजता त्या आपल्या स्कुटीने (एमएच ३१/बीएम १२५0) कर्तव्यावरून परत आल्या. वंदना आपल्या घरासमोर आल्या असताना भरधाव वेगाने आलेला मोटरसायकलचालक मोहम्मद इजहार मोहम्मद इलियास (वय २५, रा. यशेधरानगर चौक) याने वंदना यांना जोरदार धडक मारली. त्यामुळे वंदना गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सोमनाथ पांडुरंग चौधरी (वय ७२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी मोहम्मद इजहार याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. आरोपीचा शोध घेतला जात आहे. आज पहाटे ३.१५ वाजता अजनीतील हनुमाननगरात झालेल्या अपघातात एका ६0 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. छाबरा यांच्या घरासमोर हा अपघात घडला. अपघातानंतर दोषी वाहनचालक पळून गेला. मृताची ओळख पटविण्याचे अजनी पोलीस प्रयत्न करीत आहेत. (प्रतिनिधी)
जरीपटका, अजनीत अपघातात दोन ठार
By admin | Updated: May 17, 2014 01:08 IST