नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या वेळापत्रकात एकाच दिवशी ९ व १० व्या सत्राचे पेपर ठेवण्यात आले आहेत. यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसमोर नेमकी कुठली परीक्षा द्यावी असा प्रश्न पडला असून अनेक जण यामुळे चिंतित झाले आहे. यासंदर्भात युवक कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने विद्यापीठात धडक दिली.नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू आहेत. विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर १० व्या सत्राच्या विद्यार्थ्यांना धक्काच बसला. ९व्या व १० व्या सत्राचे पेपर एकाच दिवशी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये वारंवार होणाऱ्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात निष्काळजीचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांची भेट घेतली. विधी विभागातील अंतिम वषार्तील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी वेळापत्रकातील चुका दुरुस्त कराव्यात, अशी मागणी केली. यावर कुलगुरूंनी त्वरित कार्यवाही करत परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी यांना बोलावून ही चूक दुरुस्त करण्यास सांगितले. शिष्टमंडळात नागपुर शहर युवक कांग्रेस अध्यक्ष बंटी शेळके, निशांत गुरनानी, डॉ. स्वप्निल कोकाटे, आलोक कोंडापूरवार, अखिलेश राजन, नीलेश देशभ्रतार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विधी अभ्यासक्रमाचे एकाच दिवशी दोन पेपर
By admin | Updated: April 18, 2016 05:48 IST