अॅम्बुलन्स धडकली उभ्या ट्रेलरवर : एक जखमी, उमरेड येथील घटनाउमरेड/भिवापूर : रुग्णाला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पोहोचवून भिवापूरला परत जाणारी भरधाव अॅम्बुलन्स रोडवर उभ्या असलेल्या ट्रेलरवर मागून आदळली. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना उमरेड - नागपूर मार्गावरील झोडे पेट्रोलपंपसमोर शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. अपघातास कारणीभूत ही अॅम्बुलन्स उमरेडचे आ. सुधीर पारवे यांच्या लक्ष्मण बहुद्देशीय संस्थेची आहे. चेतन नीळकंठ निनावे (२५) व प्रवीण कुंभारे (२५) दोघेही रा. भिवापूर अशी मृतांची नावे असून, योगेश नीळकंठ निनावे (३०, रा. भिवापूर) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. योगेश हा अॅम्बुलन्सचालक आहे. भिवापूर येथील आझाद चौकातील कन्नाके यांच्याकडील रुग्णाला शुक्रवारी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते. मात्र, डॉक्टरांच्या संपामुळे येथे उपचार न मिळाल्याने त्या रुग्णाला एमएच-४०/वाय-२२२८ क्रमांकाच्या अॅम्बुलन्सने नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलममध्ये रात्री ८.३० वाजताच्या सुमारास हलविले. तेथूून ही अॅम्बुलन्स भिवापूर येथे परत जात असताना उमरेड शहरालगतच्या झोडे पेट्रोल पंपासमोर रोडवर उभ्या असलेल्या एचआर-३८/एच-४२४४ क्रमांकाच्या ट्रेलवर मागून आदळली. यात चेतनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, प्रवीण व योगेशला लगेच नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविले. येथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरने प्रवीणवर वेळीच उपचार करायला सुरुवात केली नाही. त्यामुळे प्रवीणचा मृत्यू झाला तर योगेशवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. योगेश हा अॅम्बुलन्सचालक असून, परतीच्या प्रवासात आपल्याला एकटेच परत यावे लागणार म्हणून त्याने त्याचा भाऊ चेतन व मित्र प्रवीणला सोबत घेतले होते. या धडकेत अॅम्बुलन्सची कॅबिन वेगळी झाली. यावरून धडकेची तीव्रता लक्षात येते. ट्रेलर रस्त्यावर उभा असताना इंडिकेटर सुरू नसल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात होताच ट्रेलरचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ठाणेदार संजय पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक नैताम तपास करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
भीषण अपघातात दोन ठार
By admin | Updated: July 6, 2014 00:50 IST