नागपूर : कपिलनगरच्या विटभट्टी परिसरात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडाल्यामुळे दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. अंकुश मनोज भालेकर (१२) आणि आदित्य कचरुलाल शरणागत (१०) रा. समतानगर अशी मृत बालकांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
विटभट्टी परिसरात मोठमोठे खड्डे आहेत. पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले आहे. या खड्ड्यांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यामुळे परिसरातील मुले खड्ड्यात पोहण्यासाठी येतात. मृत दोन्ही बालक गुरुवारी दुपारी ४ वाजता आपल्या चार-पाच मित्रांसह तेथे आले होते. खड्ड्यात उतरत असताना दोघेही बुडत होते. त्यांच्या मित्रांनी आरडाओरड केली असता एक-दोन युवक मदतीसाठी धावले. त्यांनी अंकुश भालेकरला खड्ड्यातून बाहेर काढले. त्याचा मृत्यू झाल्याची शंका आल्यामुळे अंकुशचे मित्र पळून गेले. घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पोलिसांना आदित्यही पाण्यात बुडाल्याची माहिती नव्हती. शुक्रवारी सकाळी आदित्यचा मृतदेह मिळाल्यानंतर सत्यस्थिती समजली. अंकुशच्या वडिलांचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्याची आई मजुरी करते. ती काही दिवसांपूर्वीच परिसरात रहायला आली आहे. आदित्यचे आईवडिल मजुरी करतात. या घटनेमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. विटभट्टी परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.
.................