नागपूर : रेल्वेच्या चाकांच्या चार अॅल्युमिनिअमचे ॲक्सलची चोरी करून जात असलेल्या दोन आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली. ही घटना मोतीबाग वर्कशॉपमध्ये रात्री २.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली.
सुमित चौहान (वय २५), रा. आनंदनगर, कामठी आणि मुश्ताक बकस खान (१९), रा. पंजाबी लाईन, झोपडपट्टी अशी आरोपींची नावे आहेत. मोतीबाग वर्कशॉपमधील गेट क्रमांक १२ ची भिंत तुटलेली आहे. तेथून आरोपी आत शिरले. त्यांनी रेल्वेच्या चाकाला लागत असलेले अॅल्युमिनिअमचे चार ॲक्सलची चोरी केली. चोरी करून आरोपी निघून जात होते. तेवढ्यात ड्यूटीवर असलेल्या आरपीएफ जवानांना आरोपी दिसले. त्यांना पकडून आरपीएफ ठाण्यात आणले असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याविरुद्ध रेल्वे अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी केलेले ॲक्सल २४०० रुपये किमतीचे आहेत. आरोपींनी यापूर्वीही मोतीबाग वर्कशॉपमध्ये चोरी केली असावी, असा अंदाज आहे. मोतीबाग आरपीएफ त्यांची चौकशी करीत आहे. ही कारवाई मोतीबाग आरपीएफचे निरीक्षक गणेश गरकल यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक बी. के. सिंग, बन्सीलाल हलमारे, अजिराम, आर. के. मीना यांनी पार पाडली.