नागपुरात दसऱ्याला १०० कोटींची उलाढाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 10:52 PM2019-10-09T22:52:28+5:302019-10-09T22:53:47+5:30

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी मंदीच्या सावटाखाली असलेल्या बाजारपेठेला दसऱ्यानिमित्त झळाळी आली होती. ग्राहकांनी आवश्यक वस्तू आणि दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली.

Turnover in Dussehra Rs 100 crore in Nagpur! | नागपुरात दसऱ्याला १०० कोटींची उलाढाल!

नागपुरात दसऱ्याला १०० कोटींची उलाढाल!

googlenewsNext
ठळक मुद्देसराफा, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल बाजारपेठांमध्ये गर्दी : मंदीनंतरही ग्राहकांमध्ये उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी मंदीच्या सावटाखाली असलेल्या बाजारपेठेला दसऱ्यानिमित्त झळाळी आली होती. ग्राहकांनी आवश्यक वस्तू आणि दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. या दिवशी मुख्यत्वे सराफा, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठांमध्ये जवळपास १०० कोटींची उलाढाल झाली आहे. यावर्षी ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह होता, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली.
दुचाकी, चारचाकी वाहनांसोबतच मोबाईल, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल होता. सोन्याचे दर स्थिर असल्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त विक्री झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. दसऱ्याला दोन ते अडीच हजारावर दुचाकी आणि तर ६०० पेक्षा जास्त चारचाकी वाहने नव्याने रस्त्यावर आली. सर्व इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होती.

ग्राहकांची फायनान्सवर खरेदी
दसरा सणाच्या उत्साहात भर घालण्यासाठी फायनान्स कंपन्यांनी सुलभ कर्जपुरवठा केल्याने मोटारसायकली, चारचाकींच्या विक्रीत चांगली वाढ झाल्याचे दिसून आले. दुचाकींमध्ये गीअरच्या आणि गीअरलेस अशा दोन्ही प्रकारातील जवळपास दोन ते अडीच हजार गाड्यांची विक्री झाली. यामध्ये होंडा, हिरो, बजाज, टीव्हीएस, यामाहा, महिन्द्र या मुख्य कंपन्यांचा समावेश आहे. तसेच अनेक ग्राहकांनी आधीच बुकिंग केलेले वाहन दसऱ्याच्या मुहूर्तावर घरी नेले. कमी व्याजदरात फायनान्सची सुविधा असल्यामुळे वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. फायनान्समुळे १० हजाराच्या खरेदीसाठी शोरुममध्ये गेलेल्या ग्राहकांनी २० हजारांची खरेदी केल्याची माहिती आहे.

चारचाकी खरेदीला पसंती
चारचाकी गाड्यांचीही समाधानकारक विक्री झाली आहे. केतन ह्युंडईचे उपाध्यक्ष प्रसाद पुजारी यांनी सांगितले की, प्रत्येक महिन्यात नागपुरात सर्व कंपन्यांच्या जवळपास २५०० कारची विक्री होते. मंदीमुळे काही महिन्यांपासून विक्रीवर परिणाम झाला होता. पण दसरा आणि दिवाळी सण एकाच महिन्यात आल्याने ३५०० कार विक्रीचा अंदाज आहे. दसºयाला जवळपास एक हजार कार विक्री झाली आहे. केतन ह्युंडईने दसऱ्याला ७० कारची डिलेव्हरी दिली. नागपुरातील कंपनीच्या तिन्ही शोरूममधून जवळपास १७५ कारची विक्री झाली. सर्वाधिक विक्री दिवाळीला होण्याचा अंदाज आहे. प्राप्त माहितीनुसार, मारुती सुझुकी आणि नेक्सा कारच्या नागपुरातील सहा शोरुममधून जवळपास ४५० पेक्षा जास्त कारची विक्री झाल्याचा अंदाज आहे. नागपुरात टाटा, होंडा, महिन्द्र, रिनॉल्ट आदी कंपन्यांच्या शोरुममध्ये ग्राहकांची गर्दी होती.

सराफा बाजारात झळाळी
सोने-चांदी खरेदीची इच्छा अनेकांनी दसऱ्याला पूर्ण केली. रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी सांगितले की, यावर्षी ग्राहकांचा अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. मंदीची झळ बाजारात दिसली नाही. नागपुरात सराफांची ३ हजारांपेक्षा जास्त लहान दुकाने आणि जवळपास १५ मोठ्या शोरूम आहेत. मंगळवारी १० ग्रॅम शुद्ध सोने ३८,४०० रुपये आणि चांदीचे भाव ४६,५०० रुपये होते. भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांनी खरेदीला प्राधान्य दिले. अनेक दुकानदारांनी जाहीर केलेल्या योजनांना ग्राहकांचा उत्स्फूत प्रतिसाद मिळाला. या दिवशी एक ग्रॅम ते ३० ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदीवर ग्राहकांचा भर दिसला. याशिवाय चांदीची उपकरणे मोठ्या प्रमाणात खरेदी केली. दसºयाला सराफा बाजारात झळाळी दिसून आली. दिवाळीत दागिने खरेदीसाठी ग्राहकांनी आगाऊ बुकिंग सुरू केली आहे.

 

Web Title: Turnover in Dussehra Rs 100 crore in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.