नागपूर : महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की, मनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला टाटा ट्रस्टच्या मदतीने उत्कृष्ट बनविण्यात आले आहे. येथे गेल्या तीन वर्षापासून उत्तम आरोग्य व्यवस्था उपलब्ध केली आहे. त्याच धर्तीवर शहरातील प्रस्तावित ७५ वंदे मातरम् हेल्थ पोस्टलासुद्धा टाटा ट्रस्ट मदत करणार आहे.
बुधवारी मनपा मुख्यालयात टाटा ट्रस्टचे सीईओ श्रीनाथ नरसिंहन पोहचले. महापौरांनी त्यांना हेल्थ पोस्टसाठी मदत करण्याचे आवाहन केले. नरसिंहन यांनी मुख्यालयात अधिकारी व पदाधिकाऱ्याची भेट घेतली. यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., स्थायी समितीचे सभापती विजय झलके, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, नगरसेविका मंगला गवरे, आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. संजय चिलकर, डॉ. विजय जोशी यांच्यासह टाटा ट्रस्टचे किरण पेटारे, डॉ. अमर नावकर उपस्थित होते.
तिवारी म्हणाले की, कोरोनाच्या काळात ट्रस्टने नागपूरला प्राथमिकता दिली होती. पुढेसुद्धा ट्रस्टचे सहकार्य राहणारच आहे. मनपाकडून ४० हून अधिक वयाच्या लोकांचे सर्वेक्षण करून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येईल. त्यासाठी ट्रस्टचे सहकार्य अपेक्षित आहे. टाटा ट्रस्ट व मनपादरम्यान झालेला करार डिसेंबरमध्ये संपला. त्याला पुढील तीन वर्ष वाढविण्याची गरज आहे.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी टाटा ट्रस्टच्या कामाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, ट्रस्टच्या सहकार्यामुळे आरोग्य सेवा सुधारली आहे. शहरात ५० बेडचे रुग्णालय प्रस्तावित आहे. त्यासाठी ट्रस्टच्या सहकार्याची गरज आहे. ट्रस्टच्या मदतीने २७ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहेत.
- सहयोग कायम ठेवण्याचा प्रयत्न करू
श्रीनाथ नरसिंहन म्हणाले की, मनपाकडून ट्रस्टला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यापुढेही ट्रस्ट आपल्याकडून योग्य ते सहकार्य नक्कीच करेल. ट्रस्टने नेहमीच आरोग्य क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. नरसिंहन यांनी मनपाच्या इंदोरा नागरी प्राथमिक केंद्राला भेट दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, डॉ. स्वाती गुप्ता, डॉ. वानकर उपस्थित होते.