देवरी : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मर्या. देवरी अंतर्गत येणाऱ्या आमगाव, सालेकसा व देवरी या तिन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व धान खरेदी केंद्र आदिवासी विकास महामंडळने त्वरित सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिवासी नेता तथा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मरामजोबचे अध्यक्ष रमेश ताराम यांनी केली आहे. तसेच मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला आहे.रमेश ताराम यांच्यानुसार, दरवर्षी आदिवासी विकास महामंडळाचे सबएजेंट म्हणून आम्ही धान खरेदी केंद्र सुरू करीत होतो. परंतु यावर्षी आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे मागील १५ वर्षापासून त्यांनी खरेदी केलेल्या धानाचे कमिशन अद्याप न मिळाल्याने त्या संस्थेवर आर्थिक संकट कोसळले आहे. या संबंधात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांचा एक शिष्टमंडळ महाराष्ट्राचे अन्न व नागरिक पुरवठा सचिव दीपक कपूर यांच्याशी मुंबई येथे भेट घेऊन आपली संपूर्ण समस्या सांगितली. नंतर त्यांनी आदिवासी विकास विभागाचे उपव्यवस्थापकीय संचालक व्ही.के. पाटील यांना बोलावून चर्चा केली व याबाबत माहिती मागितली. जर सदर माहिती बरोबर नसल्यास या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात येईल असा ईशाराही दिला.यात सन २००१ पासून सतत १५ वर्षे आदिवासी विकास महामंडळाचे सब एजेंटच्या रुपात धान खरेदी केंद्र सुरू करुन धान खरेदी केली. परंतु आदिवासी विकास महामंडळाने वेळेच्या आत सर्व धान खरेदी केंद्रावरील धानाची उचल न करता यात होणाऱ्या धानाची तुट ही फक्त आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या मत्थे टाकून स्वत: मोकळे होण्याचे काम केले आहे. याबाबत दरवर्षी धानाची तूटची बाब समोर ठेवून २००१ पासून करोडो रुपयांचे कमिशन दिले नाही. या संबंधात फक्त थातूरमातूर उत्तर देवून दरवर्षी वेळ काढण्याचे काम आदिवासी विकास महामंडळ करीत आहे. या कारणाने संतापून शेवटी जिल्ह्यातील सर्व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांनी यावर्षी एकही संस्था धान खरेदी केंद्र सुरू न करण्याचा निर्णय घेतला.आता आदिवासी दुर्गम भागातील गोरगरीब शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबविण्याकरिता आदिवासी विकास महामंडळाने आमगाव, सालेकसा व देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात पूर्वी सुरू असणाऱ्या संस्थेंतर्गत सर्व धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे. फक्त तालुक्यात दोन किंवा तीन धान खरेदी केंद्र सुरू करुन शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला थांबवावे, अशी मागणी आदिवासी विविध कार्यकारी संस्था मरामजोबचे अध्यक्ष तथा राकाँचे आदिवासी नेते रमेश ताराम यांनी केली आहे. सदर मागणी त्वरित पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा रमेश ताराम यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
आदिवासी महामंडळाने सर्व धान खरेदी केंद्र सुरू करा
By admin | Updated: November 19, 2015 02:24 IST