लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महापालिकेच्या उद्यान विभागाने नगरसेवक व स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून सुरक्षेच्या दृष्टीने उत्तर नागपुरातील विविध भागातील झाडांच्या फांद्या छाटण्याचे आदेश दिले. त्यानुसार फांद्या छाटण्यात आल्या. परंतु फांद्या छाटताना यासंदर्भात जाहीर नोटीस प्रकाशित केली नाही, यात नियमाचे उल्लंघन झाले. असा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केला आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने झाडांच्या फांद्या छाटण्यात याव्या, अशी मागणी नगरसेवक मनोज सांगोळे, दिनेश यादव, वैशाली नारनवरे व राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटीच्या विदोत्तमा डॅनियल आदींनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे केली होती. तसेच परिसरातील नागरिकांचीही मागणी होती. याचा विचार करता उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोका पाहणी करून मानव नगर ,मिलिंद नगर, मैत्री उद्यान, डॉ. आंबेडकर स्विमीग स्पोर्ट कॉम्प्लेक्स आदी परिसरातील झाडांच्या फांद्या छाटल्या. परंतु झाडांच्या फांद्या छाटल्या पूर्वी उद्यान विभागाच्या अधीक्षकांनी यासंदर्भात वृत्तपत्रात जाहीर नोटीस प्रकाशित करून यावर आक्षेप मागविणे गरजेचे होते. अशी ऑनलाईन तक्रार आरटीआय कार्यकर्ते सचिन खोब्रागडे यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे केली आहे. परंतु या तक्रारीची अद्याप दखल घेतली नाही. उद्यान अधीक्षक यांच्या आदेशावरून १७ झाडांच्या फांद्या छाटण्यात आलेल्या आहेत. नियम सर्वांसाठी नाहीत का अशी विचारणा त्यांनी या तक्रारीतून केली आहे.
....
नियमाचे कोणतेही उल्लंघन नाही
नगरसेवक व नागरिकांच्या तक्रारीवरून सुरक्षेच्या दृष्टीने झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या.यात नियमाचे उल्लंघन झालेले नाही. मोठे झाड तोडवयाचे असल्यास त्यासाठी जाहीर नोटीस प्रकाशित करावी लागते. पाहणी करून फांद्या छाटण्यात आल्या आहेत.
अमोल चोरपगार, उपायुक्त (उद्यान) मनपा