नागपूर : नक्षलविरोधी अभियान प्रशिक्षण केंद्र ‘यूटीसी’ची पाईप लाईन फोडून एका ट्रान्सपोर्टरने स्वत:कडे अवैध पाणीपुरवठा केला. परिणामी युटीसी कॅम्पला सहा महिन्यात दीड लाखांचा फटका बसला. हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अशोक नारायण रुपनारायण (वय ३९) यांनी आरोपी सुनील पांडेय विरुद्ध तक्रार दाखल केली. आरोपी पांडेय वाहतूक व्यावसायिक (ट्रान्सपोर्टर) असून, त्याच्याकडे किरायदारही राहतात. स्वत: आणि आपल्या भाडेकरूंना अवैध पाणीपुरवठा करण्यासाठी पांडेयने नागपूर अमरावती महामार्गावरील वडधामना येथील सरकारी पाईप लाईन फोडली. त्यामुळे युटीसीला मोठ्या प्रमाणावर बिल येऊ लागले. ५ ते ६ महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकाराची चौकशी केली असता पांडेयने हे कृत्य केल्याचे उघड झाले. त्याच्यामुळे युटीसीला १ लाख, ५४ हजारांचा भरणा सहन करावा लागला. पांडेयच्या या गैरप्रकाराची तक्रार एपीआय रुपनारायण यांनी वाडी ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, पांडेयला अटक झाली की नाही, ते रात्रीपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)
ट्रान्सपोर्टरने फोडली ‘युटीसी’ची पाईप लाईन
By admin | Updated: January 10, 2015 02:25 IST