मुख्यमंत्री : शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावरनागपूर : शिक्षकांच्या हिताचा विचार करताना, विद्यार्थ्यांचे हितही महत्त्वाचे आहे. परंतु शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्येच भ्रष्टाचार होत असले तर, शिक्षक कुठले मूल्य विद्यार्थ्यांना शिकवतील. शिक्षक हा मूल्याची जपणूक करणारा महत्त्वाचा घटक असल्यामुळे, त्याला भ्रष्टाचाराचा गंध लागायला नको, यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी शासन स्तरावर प्रणाली निर्माण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपुरात शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात सोमवारी शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, भाजपाचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, आमदार अनिल सोले, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, समीर मेघे, मल्लिकार्जुन रेड्डी, देवराव होळी, नाना श्यामकुळे, अशोक जिवतोडे, प्रभूजी देशपांडे, डॉ. कल्पना पांडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या १५ वर्षापासून विनाअनुदानित शाळांचा प्रश्नावर आंदोलन सुरू होते. अनुदानासंदर्भात सर्व अडथळ्यांना दूर करून २० टक्के अनुदान मिळवून दिले. गेल्या दोन वर्षात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे धोरण राबविताना शाळांना डिजिटल केले. आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात देशात १६ व्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र ३ ऱ्या क्रमांकावर आला. आज सरकार शिक्षण क्षेत्रावर वर्षाला ५५००० कोटी रुपये खर्च करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.(प्रतिनिधी)
नियुक्त्यांमधील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी पारदर्शी प्रणाली
By admin | Updated: January 17, 2017 02:08 IST