लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - शहरातील तीन सहायक पोलीस आयुक्तांसह (एसीपी) २१ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अचानक बदल्या करून पोलीस आयुक्तांनी शहर पोलीस दलात खळबळ उडवून दिली. बदल्या झालेल्यांमध्ये काही ठाणेदारांचाही समावेश आहे. त्यांची उचलबांगडी करतानाच काही पोलीस निरीक्षकांना ठाणेदार म्हणून काम करण्याची संधीही देण्यात आली आहे.
धक्कातंत्राचा अवलंब करून कारवाईचे पाऊल उचलणारे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहर पोलीस दलात ध्यानीमनी नसताना शुक्रवारी रात्री बदल्यांची यादी जाहीर केली. शहरातील गुन्हेगारीचा चांगला अभ्यास असणारे आणि कमी वेळेत अनेक मकोका प्रकरणाचा तपास करून खुद्द पोलीस आयुक्तांनीच गेल्या आठवड्यात सन्मानित केलेले गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांचेही बदलीच्या यादीत नाव आहे. त्यांना एसीपी सदर म्हणून नियुक्ती दिली. त्यांच्याकडे सीताबर्डीचाही अतिरिक्त कार्यभार राहणार आहे. सदरच्या एसीपी रेखा भवरे यांना विशेष शाखेत तर एसीपी जरीपटका परशुराम कार्यकर्ते यांना एसीपी एमआयडीसी म्हणून नेमण्यात आले आहे. कार्यकर्ते त्यांना सोनेगाव विभागाचाही अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. नंदनवनचे ठाणेदार सांदिपान पवार यांना गुन्हे शाखेत तर गुन्हे शाखेचे किशोर पर्वते यांना नंदनवनचे ठाणेदार म्हणून नियुक्त करण्यात आले. बुकी आणि सुपारीवाल्यांसह अनेक अवैध धंद्याची सूक्ष्म माहिती असलेले शाखेचे विनोद चाैधरी यांना अजनीचे ठाणेदार म्हणून नियुक्त करण्यात आले तर येथील प्रदीप रायन्नावार यांना गुन्हे शाखेत पाठविण्यात आले. गिट्टीखदानचे ठाणेदार सुनील चव्हाण यांची आर्थिक गुन्हे शाखेत तर त्यांच्या जागेवर गुन्हे शाखेतील जी. के. कल्याणकर, यशोधरानगरचे ठाणेदार रमाकांत दुर्गे यांना विशेष शाखेत, मानकापूरचे गणेश ठाकरे यांची नियंत्रण कक्षात, आर्थिक गुन्हे शाखेचे ललित वर्टीकर यांची विशेष शाखेत, तर येथीलच प्रशांत माने यांची सीताबर्डीत (द्वितीय) कपिलनगरचे ठाणेदार एम. डी. शेख आणि गिट्टीखदानचे द्वितीय निरीक्षक एस. एस.अढाऊ यांची गुन्हे शाखेत, गुन्हे शाखेच्या तृप्ती सोनवणे यांची जरीपटक्यात तर गेल्या आठवड्यात वाहतूक शाखेच्या एकमेव महिला प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आशालता खापरे यांची सदर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. सायबर सेलचे जी. जे. जामदार यांना शांतीनगरचे ठाणेदार, आरोपी सेलचे भारत क्षीरसागर यांना गणेशपेठचे ठाणेदार तर सदरचे अमोल देशमुख यांना कपिलनगरचे ठाणेदार बनविण्यात आले. अनेक धडाकेबाज कारवाया करणारे गुन्हे शाखेचे अशोक मेश्राम यांना यशोधरानगर ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
----
मांडवधरे ठरल्या पहिल्या ठाणेदार
बजाजनगरच्या द्वितीय निरीक्षक, बीडीडीएस आणि आता तक्रार निवारण कक्ष सांभाळणाऱ्या वैजयंती मांडवधरे यांना पोलीस आयुक्तांनी मानकापूरच्या ठाणेदार म्हणून जबाबदारी सोपविली आहे. शहरात ३२ पोलीस ठाणी आहेत; मात्र गेल्या १५ वर्षांत ठाणेदार म्हणून महिला अधिकाऱ्याला काम करण्याची संधी मिळालेल्या मांडवधरे या दुसऱ्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत. यापूर्वी २ जुलै २०१७ ते १२ मार्च २०१८ या कालावधीत धंतोलीच्या ठाणेदार म्हणून सीमा मेहंदळे यांनी कामकाज सांभाळले होते.
----
अनेक ठाणेदारांना इशारा
बदलीच्या या घडामोडीतून अनेक ठाणेदारांना अप्रत्यक्ष इशारा मिळालेला आहे. शहरातील काही ठाणेदार कमालीचे निष्क्रिय आहेत. एक ठाणेदार तर ठाण्यात कमी आणि बाजार समितीच्या विश्रामगृहातच जास्त वेळ घालवतो. आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्याला त्यांनी ठाण्याच्या कारभाराची धुरा सोपविली आहे. पुढच्या काही दिवसात अशा निष्क्रिय ठाणेदारांचीही बदली होण्याचे संकेत आहेत.
----