रस्ते, गडरलाईनसाठी नगरवासीयांचा संघर्ष ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:07 AM2021-02-27T04:07:58+5:302021-02-27T04:07:58+5:30

नागपूर : नागपूर शहराचा कायापालट होत आहे. शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा मिळत आहेत. परंतु संघर्षनगरातील नागरिकांच्या नशिबी मूलभूत ...

Townspeople struggle for roads, gutters () | रस्ते, गडरलाईनसाठी नगरवासीयांचा संघर्ष ()

रस्ते, गडरलाईनसाठी नगरवासीयांचा संघर्ष ()

googlenewsNext

नागपूर : नागपूर शहराचा कायापालट होत आहे. शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा मिळत आहेत. परंतु संघर्षनगरातील नागरिकांच्या नशिबी मूलभूत सुविधाही नाहीत. त्यांना खराब रस्त्यावरूनच चालावे लागते. गडरलाईन नेहमीच चोक होत असल्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतो. अशा एक ना अनेक समस्या संघर्षनगरातील नागरिकांनी ‘लोकमत’कडे मांडल्या.

रस्त्यांची अवस्था बिकट

वाठोडा चौक ते भांडेवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील गिट्टी उखडली आहे. अशा रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहनचालकांना तर सोडाच, या रस्त्याने नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे. रस्त्यावर उडत असलेल्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वस्तीतील अंतर्गत रस्त्यांची अवस्थाही खराब झाली आहे. त्यामुळे या भागातील रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

गडरलाईनमुळे पसरते दुर्गंधी

संघर्षनगरात गडरलाईन आहे. परंतु या गडरलाईनचे चेंबर जागोजागी तुटलेले आहेत. त्यामुळे वस्तीत नेहमीच दुर्गंधीचे वातावरण राहते. परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेने या भागातील गडरलाईनची नियमित देखभाल करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.

या भागात इलेक्ट्रिक खांबावरील लाईट सकाळी ५ वाजता बंद होतात. त्यामुळे सकाळीच फिरायला जाणाऱ्या महिला, नागरिकांना अंधारातच फिरावे लागते. त्यामुळे हे स्ट्रीटलाईट उशिरा बंद करावेत, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.

नियमित होत नाही सफाई

सफाई कर्मचारी नियमित येत नसल्यामुळे या भागात नेहमीच कचरा साचलेला आढळतो. कचरा उचलणारी गाडी आठवड्यातून एक वेळा नागरिक झोपेत असताना सकाळी ६ वाजताच येते. त्यामुळे नाईलाजास्तव या भागातील नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. महापालिकेने या भागात नियमित कचरा संकलन करण्याची गरज आहे. तसेच या भागात असलेले मंदिर महापालिकेने अतिक्रमण हटावच्या कारवाईत तोडले. तेथे नगरसेवकांनी लावलेल्या बेंचवर असामाजिक तत्त्वे बसतात. त्यामुळे वस्तीतील महिला, नागरिकांना त्रास होतो. पोलिसांनी या असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे.

विजेची वायर जीवघेणी

संघर्षनगरात प्रत्येक गल्लीत विजेचे खांब नाहीत. त्यामुळे ज्या गल्लीत खांब आहेत त्या गल्लीतून इतर नागरिकांना विजेचे कनेक्शन घ्यावे लागते. त्यामुळे नागरिकांच्या घरावरून विजेच्या तारा लोंबकळत आहेत. या विजेच्या तारा तुटल्यास नागरिकांना विजेचा धक्का बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महावितरणने प्रत्येक वस्तीत विजेचे खांब लावून नागरिकांना संभाव्य धोक्यापासून वाचविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्याचे डांबरीकरण व्हावे

‘रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करण्याची गरज आहे.’

- आकाश घिवदोंडे, नागरिक

गडरलाईनची देखभाल करावी

‘गडरलाईन वारंवार चोक होत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने या भागातील गडरलाईनची नियमित देखभाल करण्याची व्यवस्था करावी.’

- प्रकाश जुमडे, नागरिक

नियमित सफाई महत्त्वाची

‘परिसरात सफाई कर्मचारी नियमित येत नसल्यामुळे कचरा साचून राहतो. कचरा उचलणारी गाडीही भल्या पहाटे येत असल्यामुळे उपयोग होत नाही. त्यामुळे परिसरात नियमित सफाई करण्याची गरज आहे.’

- श्याम सिल्वेस, नागरिक

स्ट्रीटलाईट लवकर बंद करू नयेत

‘संघर्षनगर परिसरातील स्ट्रीटलाईट सकाळी ५ वाजताच बंद होतात. त्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या महिला, नागरिकांना अंधारातच फिरावे लागते. महापालिकेने या भागातील स्ट्रीटलाईट उशिरा बंद करण्याची गरज आहे.’

- सरिता गुप्ता, महिला

असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करावा

‘परिसरात असामाजिक तत्त्वांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे महिलांना रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जावे लागते. पोलिसांनी या असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.’

- बेबी वानखेडे, महिला

विजेचे खांब लावावेत

‘संघर्षनगरात प्रत्येक गल्लीत विजेचे खांब नाहीत. नागरिकांच्या घरावर विजेच्या तारा लोंबकळत असतात. त्यामुळे धोका होण्याची शक्यता असून प्रत्येक गल्लीत विजेचे खांब लावण्याची व्यवस्था करावी.’

- बबली ब्रम्हे, महिला

.................

Web Title: Townspeople struggle for roads, gutters ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.