आता लक्ष प्रवेश प्रक्रियेकडे : निकालाचा टक्का वाढला लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’चा(नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट) निकाल शुक्रवारी जाहीर झाला. निकालांमध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली असली तरी महाविद्यालयांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी निखील संगतानी याने अव्वल क्रमांक पटकाविला आहे. त्याला ७२० पैकी ६४५ गुण प्राप्त झाले व अखिल भारतीय पातळीवर त्याचा ४३३ इतका क्रमांक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढलेली दिसून येत आहे. मागील वर्षी नागपुरातील एकाही विद्यार्थ्याला ६२५ हून अधिक गुण मिळाले नव्हते. ७ मे रोजी ‘नीट’चे आयोजन करण्यात आले होते. शहरात एकूण ६० परीक्षा केंद्रांवर रविवारी ३० हजारांहून अधिक परीक्षार्थी सहभागी झाले होते. ‘नीट’चा निकाल जाहीर करण्याचे आदेश १२ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी निकाल जाहीर करण्यात आला. निखील पाठोपाठ शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्याच मीनल घोटकर हिने ६४४ गुणांसह शहरातून द्वितीय स्थान पटकाविले. मुलींमध्ये ती प्रथम आहे. तर याच महाविद्यालयाची निकिता चांडक ही ६३३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. निकालात मुलींचाच वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. निकालांमध्ये शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याचे चित्र आहे.‘नीट’मध्ये विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये अडचण जाणवली. विशेषत: भौतिकशास्त्राचा पेपर हा आकडेमोडीमुळे लांबलचक व कठीण वाटला होता. याचा परिणाम ‘नीट’मध्ये जाणवला. नियमित अभ्यासातून मिळाले यश : निखिल संगतानी शहरातून प्रथम आलेल्या निखिल संगतानी याने अपेक्षेनुरूप यश मिळाल्याचे सांगितले. गेले दोन वर्षे मी नियमित अभ्यासावर भर दिला होता. अभ्यासाचा जास्त तणावदेखील घेतला नव्हता. मात्र दररोज तीन ते चार तास अभ्यास सुरू होता. शेवटच्या दिवसांमध्ये तर सरावावर जास्त भर दिला. मला दिल्ली विद्यापीठ किंवा दिल्लीतील मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा आहे. पुढे जाऊन नेमके कशात ‘स्पेशलायझेशन’ करायचे याचा विचार केलेला नाही, अशी निखिलने प्रतिक्रिया दिली. बारावीत त्याला ९१.५३ टक्के मिळाले. गेली दोन वर्षे निखिल ‘सोशल मीडिया’पासून दूरच होता. त्याचे वडील सुनील हे व्यावसायिक आहेत.
‘नीट’मध्ये निखील संगतानी ‘टॉप’
By admin | Updated: June 24, 2017 02:14 IST