लोकमत विशेष
रियाज अहमद
नागपूर : आरटीईमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालक नाना प्रकारचे खटाटोप करीत आहेत. नियमांना डावलुन कागदपत्रांच्या नावावर दिखावा करण्यात येत आहे. सत्यस्थिती यापेक्षा वेगळी आहे, परंतु प्रशासन उदासीन आहे. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत हा धक्कादायक खुलासा झाला आहे.
वर्धा मार्गावरील चिंचभवन येथील एका खासगी नामवंत शाळेत मुलांना प्रवेश देण्यासाठी अनेक पालकांनी आपल्या रिकाम्या प्लॉटवर टीनाचे शेड उभारले आहे तर काही पालकांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा रहिवासी पत्ता नोंदवून विजेचे बिल जोडले. आरटीई अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष व शिक्षण विभागाने गठित केलेल्या व्हेरिफिकेशन समितीचे व्हेरिफिकेशन ऑफिसर मो. शाहिद शरीफ यांच्या समोर तक्रार घेऊन पोहोचलेल्या चिंचभवन येथील संबंधित शाळेजवळ राहणाऱ्या काही स्थानिक पालकांनी सांगितले की, ते मूळचे स्थानिक असूनही त्यांच्या मुलांना प्रवेश मिळाला नाही. त्यांची तक्रार घेऊन ‘लोकमत’ची चमू लॉटरीत प्रवेश मिळालेल्या पालकांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचली असता टीनाचे शेड आणि बांधकाम सुरू असलेल्या इमारती आढळल्या. तेथे अद्याप कुणीही राहण्यास गेलेले नाही. नियमानुसार अर्जदाराचे राहते घर शाळेपासून एक किलोमीटर दूर असायला हवे. तेथे ते राहत असायला पाहिजे. दरम्यान येथे प्लॉट नं. ५५३ सेक्टर क्रमांक ३५ अर्ज क्रमांक १८६२९ च्या पालकाच्या घरी रिकामे असलेले टीनाचे शेड आढळले. तेथे कोणीच राहत नाही. अर्ज क्रमांक ०१३३८३७ च्या प्लॉट क्रमांक १०४, सेक्टर ३४ वर अपूर्ण बांधकाम असलेली इमारत आढळली. अर्ज क्रमांक ०२०३५४ च्या प्लॉट क्रमांक २७४ सेक्टर क्रमांक ३४ चा प्लॉट रिकामा आढळला. तेथे फक्त गवत उगवलेले होते. तर अर्ज क्रमांक ०२८३४४ ने सांगितलेल्या पत्त्यावर पालक आढळलेच नाही. नियमानुसार प्रवेशासाठी तपासणी करण्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, गॅस पास बुक, पाणी बिल, ड्रायव्हिंग लायसन्सपैकी एक कागदपत्र असणे आवश्यक आहे. परंतु पालकांनी केवळ विजेचे बिल जोडले. हे बिल कोणत्याही जमिनीवर टीनाचे शेड उभारल्यास सहज मिळते. काही घरांचे विजेचे बिल असे होते की तेथे खूपच कमी युनिट रिडींग आढळले. याबाबत शिक्षण विभागाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने शिक्षणाधिकाऱ्यांना अनेकदा संपर्क केला. परंतु त्यांनी फोन उचलला नाही.
..............
गुन्हा दाखल व्हायला हवा
‘प्रवेश मिळविणारे पालक शाळेपासून खूप दूर सोनेगावमध्ये राहतात. त्यांनी प्रवेशासाठी एकही योग्य पुरावा जमा केला नाही. त्यामुळे त्यांना मिळालेली लॉटरी स्थगित केली पाहिजे. सोबतच बनावट कागदपत्र जमा केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल व्हायला हवा.’
-मो. शाहिद शरीफ, अध्यक्ष आरटीई अॅक्शन कमिटी
................