- घाबरू नका, सजग व्हा : मुलांच्या वागणुकीतील बदलांकडे लक्ष ठेवा
- डोळ्यांमध्ये होणारा दाह हे प्रारंभिक लक्षण असू शकते
मेहा शर्मा / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ७ एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार कोरोना संक्रमित शिशू व किशोरवयीन मुलांची संख्या २,९९,१८५ इतकी आहे. यात दहा वर्षाच्या आतील संक्रमितांची संख्या ९५,२७२ तर ११ ते २० वयोगटातील संक्रमितांची संख्या २,०३,९१३ इतकी आहे. संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत प्रौढांसोबतच लहान मुलेही मोठ्या संख्येने बाधित होत आहेत. तथापि, घाबरण्याचे कारण नसून केवळ सुपर स्प्रेडर्सपासून सावध आणि सजग राहण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे. डॉक्टरांच्या मते, मुलांमधील कोणताही बदल जसे चिडचिड, आळशीपणावर लक्ष देणे गरजेचे आहे. यामुळे संपूर्ण कुटुंबाला संक्रमणापासून वाचवता येईल. पालकांची सजगताच मुलांचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यास मदत करते.
---------------
वर्तमान स्थितीत अनेक मुलांना ताप, सर्दी, खोकला नसला तरी डोळ्यांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे पालकांनी सजग होण्याची गरज आहे. इतर कोणत्याही लक्षणांची वाट बघण्यापेक्षा मुलांना विलगीकरणात ठेवल्यास, त्यांचा भावी संक्रमणापासून बचाव करता येईल. अशा स्थितीत मुलांना मोकळ्या वातावरणात खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. मुले एकटी खेळत असली तरी ती कधी इतरांमध्ये मिसळतील, हे सांगता येत नाही. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात हा वायुजन्य संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, घाबरण्याचे कारण नाही. बहुतेक मुले रोगनिदानविषयक उपचारांना प्रतिसाद देतात आणि पोषण आहार घेत असतात. त्यामुळे सगळ्यांनी पौष्टिक आहार घ्यावा. सगळ्यांनी मुखाच्छादन अर्थात मास्कचा वापर करावा. पाच वर्षाखालील मुलांना मास्कचे महत्त्व समजावणे कठीण आहे. त्यांना गुदमरल्यासारखे वाटू शकते. यासोबतच मुलांसाठी स्वतंत्र वॉशरूम तयार करणे किंवा प्रत्येकाच्या उपयोगानंतर ते स्वच्छ करणे महत्त्वाचे ठरेल.
- डॉ. राजेश अग्रवाल, बालरोगतज्ज्ञ
-----------------
मुलांना संक्रमणाचा धोका सर्वाधिक आहे, याबाबत घाबरून जाण्याचे कारण नाही. एकूणच रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बालरुग्णांची संख्याही वाढत आहे. विषाणूच्या उत्परिवर्तनामुळे अर्थात म्युटेशनमुळे ही शक्यता आहे. विशेष म्हणजे कोरोना संक्रमणाची पहिली लाट शमल्यानंतर मुले मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले असल्याने, मुलांमध्ये संक्रमणाची लक्षणे दिसायला लागली आहेत. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप एक दिवसाचा का असेना मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुलांमध्ये सौम्य लक्षणे आढळताच तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळीच सजगता पुढील गुंतागंत टाळण्यास मदत करते आणि संक्रमणाचा प्रसार रोखता येऊ शकतो. बहुतेक पालक मुलांची कोरोना चाचणी करण्यास टाळाटाळ करतात. मात्र, पुढील क्लिष्टता टाळण्यासाठी ते आवश्यक आहे.
- डॉ. सतीश देवपुजारी, वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ
.................