मंगेश व्यवहारे
नागपूर : दहावी परीक्षा म्हटले की राज्य शिक्षण मंडळापुढे एका आव्हान असते. परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यापासून निकाल घोषित करेपर्यंत अनेक टप्पे बोर्डाला पार पाडावे लागतात. पण कोरोनामुळे हे सर्व टप्पे रद्द होत गेले. केवळ निकाल घोषित करण्यापुरतेच बोर्डाचे काम राहिले. विशेष म्हणजे यंदा निकाल घोषित झाल्यानंतरच्या भानगडीही बोर्डाला जाणवणार नाहीत.
शुक्रवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल घोषित केला. राज्यातील १५ लाख ७५ हजारावर विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची प्रतीक्षा बोर्डाने संपविली. खरे तर बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच परीक्षा न घेता निकाल लागलेला आहे. कोरोनामुळे परीक्षा बोर्ड घेऊ शकले नाही. पण विद्यार्थ्यांना निकाल द्यायचा ही भूमिका शासनानेच घेतली आणि त्यासंदर्भातील सर्व जबाबदारी बोर्डाने शाळांवर ढकलली.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी बोर्ड ऑक्टोबर महिन्यापासूनच तयारीला लागले. विद्यार्थ्यांकडून परीक्षेचे अर्ज भरणे, परीक्षेचे ओळखपत्र विद्यार्थ्यांना पोहचविणे, परीक्षेसाठी सेंटरची निवड करणे, परीक्षेचे वेळापत्रक घोषित करणे, परीक्षा घेण्यासाठी मनुष्यबळाची जुळवाजुळव करणे, परीक्षेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून भरारी पथकाची नियुक्ती करणे, परीक्षेच साहित्य पोहचविणे, केंद्रावर सुरक्षा ठेवणे, परीक्षा झाल्यानंतर कस्टोडियनची नियुक्ती करणे, पेपरच्या तपासणीसाठी मॉडरेटर, चीफ मॉडरेटर, व्हॅल्युअरची नियुक्ती करणे, परीक्षेचे निकाल घोषित करेपर्यंत म्हणजेच जून महिन्यापर्यंत या सर्व कामाच्या व्यस्ततेत बोर्ड असते. यंदा मात्र या सर्व कामापासून बोर्ड रिलॅक्स होते.
- यंदा काय केले बोर्डाने
बोर्डाने विद्यार्थ्यांकडून परीक्षेचे अर्ज भरून घेतले. वेळापत्रक घोषित केले. ओळखपत्र शाळेच्या लॉगिनवर टाकले. उत्तरपत्रिका काही शाळेत पोहचविल्या. पण वेळेवर परीक्षा रद्द झाल्या. शासनाने परीक्षा रद्द झाल्या तरी निकाल घोषित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बोर्डाने समिती गठित करून एक फॉर्म्युला तयार केला. तो फाॅर्म्युला शाळांना पाठविला. एकदा शिक्षकांचे मार्गदर्शन केले. गुणदानाची जबाबदारी शाळांवर ढकलली आणि निकाल घोषित केला.
- निकालानंतरची डोकेदुखी संपविली
निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी बोर्डाकडे अर्ज करतात. निकालानंतर आठवडाभर ही प्रक्रिया सुरूच असते. पण यंदा पुनर्मूल्यांकनाची तरतूद नाहीच. श्रेणीसुधारच्या विद्यार्थ्यांचा विषयच संपविला.
- ना विद्यार्थ्यांचे झाले कौतुक, ना शाळांची थोपटली पाठ
दरवर्षी दहावीचा निकाल घोषित करताना विभागीय मंडळ पत्रकार परिषद घेऊन आपल्या मंडळाचा आढावा मांडतात. यंदा बोर्ड परीक्षा घेऊ शकले नाही तरी बोर्डाच्या निर्देशाप्रमाणे शाळांनी विद्यार्थ्यांना गुणदान केले. निकाल लागले पण विभागीय मंडळाने यंदा पत्रकार परिषद टाळलीच. बोर्डाच्या अध्यक्षांनी निकालाचे साधे आकलनही केले नाही. विद्यार्थ्यांचे साधे कौतुक देखील नाही, शाळांची पाठ देखील थोपटली नाही.