टिपेश्वर अभयारण्यातील सुमारे अडीच वर्षाचा वाघ दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून आता पुन्हा परतीच्या मार्गावर लागला आहे. त्याला बसविलेल्या कॉलर आयडीवरून वनविभाग त्याचे लोकेशन सतत मिळवित आहे.
दीड हजार किमीचा प्रवास करून 'तो' वाघ आता परतीच्या वाटेवर
ठळक मुद्देवाघ टिपेश्वरचा : ज्ञानगंगा अभयारण्य ते अजिंठा टेकड्यांचा दोन महिन्यात प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टिपेश्वर अभयारण्यातील सुमारे अडीच वर्षाचा वाघ दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून आता पुन्हा परतीच्या मार्गावर लागला आहे. त्याला बसविलेल्या कॉलर आयडीवरून वनविभाग त्याचे लोकेशन सतत मिळवित आहे. सध्या हा वाघ अजिंठाच्या जंगलातून परतीच्या मार्गाला लागला आहे.हा वाघ सुमारे अडीच वर्षांचा असून टिपेश्वर अभयारण्यामध्ये त्याचा वावर होता. या अभरायरण्यामध्ये २७ फेब्रुवारी २०१९ ला त्याला कॉलर (टीपीडब्युएल टी-१/सी-१) बसविण्यात आली. आईपासून विभक्त झालेला हा वाघ आपल्या अधिवासाच्या शोधात आहे. टिपेश्वरमधून बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात गेल्या नोव्हेंबरमध्ये तो पोहचला होता. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्याने ज्ञानगंगा अभयारण्यात भ्रमंती केली होती. त्यानंतर तो पश्चिमेकडे औरंगाबाद-जालना जिल्ह्यातील अजिंठ्याच्या टेकड्या व अजिंठ्याच्या जंगलात पोहचला होता. डिसेंबरच्या मध्यात तो औरंगाबाद वन विभागाच्या फरदापूरमध्ये व त्यानंतर सोयगाव वन परिक्षेत्रात होता, अशी नोंद वन विभागाकडे आहे.सुरक्षित अधिवासाच्या शोधात असलेला हा वाघ आता परतीच्या प्रवासाला लागला आहे. सध्या त्याचे वास्तव्य अजिंठ्यामध्ये नसल्याची नोंद त्याच्या कॉलर आयडी वरून वनविभागाने केली आहे. यावरून तो परतीच्या प्रवासाला लागल्याचे स्पष्ट झाले आहे. कमी कालावधीत अधिक अंतर पार करणाऱ्या या वाघाने अद्याप कोणतीही अनुचित घटना स्वत:हून केली नसल्याचा निर्वाळा वन विभागाने दिला आहे.आतापर्यंत दीड हजार किलोमीटरचे अंतर पार करून हा वाघ निघाला आहे. कमी कालावधीत अधिक अंतर पार करण्याची त्याची क्षमता असल्याने एवढ्या कमी कालावधीत त्याने हे अंतर पार केले. त्याच्या सर्व हालचालीबाबत मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर आणि अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) बी.एस. हुड्डा यांच्या मार्गदर्शानाखाली भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून येथील तांत्रिक चमूच्या साहाय्याने त्याची इत्थंभूत माहिती वन विभागाला मिळत आहे.भ्रमणमार्गात अडथळा नकोया वाघाच्या परतीच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी वनविभागाने आवाहन केले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी त्याच्या सुरक्षित अधिवासासाठी आणि भ्रमणमार्गासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.