लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातील आनंदनगरातील काही घरांवर रात्रीच्यावेळी दगडफेक केली जात आहे. हा प्रकार आठवडाभरापासून सुरू असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात याेग्य कारवाई करून आराेपीस अटक करावी, अशी मागणी नागरिकांनी कामठी (नवीन)चे ठाणेदार संजय मेंढे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. दुय्यम पोलीस निरीक्षक राधेश्याम पाल यांनी निवेदन स्वीकारले.
शहरातील आनंदनगर, रामगड या भागातील काही घरांवर आठ दिवसांपासून रात्रीच्यावेळी दगडफेक केली जात आहे. परिसरातील नागरिकांनी दगडफेक करणाऱ्यांचा शाेध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यात फारसे यश आले नाही. हा प्रकार वाढत चालला आहे. दगडांमुळे घरांचे नुकसान हाेत असून, जखमी हाेण्याची शक्यता बळावल्याने कुणीही भीतीमुळे घराबाहेर पडत नाही. त्यामुळे दगडफेक करणाऱ्या असामाजिक तत्त्वांचा कायम बंदाेबस्त करावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
दोन वर्षापूर्वी याच परिसरातील घरांवर दगडफेक केली जायची. तत्कालीन डीसीपी हर्ष पोद्दार, एसीपी प्रवीण परदेशी, पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांनी ही दगडफेक रोखली होती. शिष्टमंडळात नगरसेविका संध्या रायबोले, सविता टेकाम, शमीम बानो, विमल बघेल, अरुणा मोहबे, पल्लवी भोयर, शांता इनकरे, वसीम शेख, पपिता भोंडेकर, सत्यभामा तांडेकर, मुन्ना बारेकर, किरण खरोले, उज्ज्वल रायबोले, विक्की बोंबले, बादल कठाणे, अभिषेक कनोजे, सागरता चौरे, कविता मोहबे, रशिदा बेगम, आशा डांगे, रश्मी नाईक यांचा समावेश होता.