लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक करून त्यांच्या कडून ४८८८ रुपये किमतीच्या दारूच्या १८८ बॉटल जप्त केल्या.गुरुवारी दुपारी २.४५ वाजता रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकातील सहायक उपनिरीक्षक सीताराम जाट, प्रधान आरक्षक शशिकांत गजभिये, अश्विनी मुळतकर, नीता माझी, सीताबर्डी पोलीस ठाण्याचे जयपाल राठोड, चंद्रशेखर गौतम, पंकज बागडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक केशव चौधरी, उपनिरीक्षक संजय मोरे, धनश्री डोंगरे हे रेल्वेस्थानकावर पाहणी करीत होते. त्यांना प्लॅटफार्म क्रमांक २ वर इटारसी एण्डकडील भागात उभ्या असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक १६०३२ अंदमान एक्स्प्रेसच्या महिला कोचमध्ये ३ महिला हातात वजन असलेली पिशवी घेऊन संशयास्पद स्थितीत आढळल्या. पिशवीत काय आहे याची विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. अधिक चौकशी केली असता त्यांनी पिशवीत दारूच्या बॉटल असल्याचे सांगितले. त्यांना आरपीएफ ठाण्यात आणून उपनिरीक्षक भुरासिंग बघेल यांच्या समोर हजर करण्यात आले. त्यांनी आपले नाव कविता वसंता बानोत (४०) रा. शिवाजी वॉर्ड धनसर पेट्रोल पंपाजवळ, बामनी बल्लारशाह, चंद्रपूर, रमा श्रीराम सहारे (६५) बुद्धनगर वॉर्ड कादरा टेकडी परिसर, बल्लारशाह आणि जुली गणेश बदावत (२४) साईबाबा वॉर्ड, बल्लारशाह चंद्रपूर असे सांगितले. त्यांच्याकडून दारूच्या ४८८८ रुपये किमतीच्या १८८ बॉटल जप्त करण्यात आल्या. निरीक्षक रवी जेम्स यांच्या आदेशानुसार जप्त करण्यात आलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आली. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 22:54 IST
रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक करून त्यांच्या कडून ४८८८ रुपये किमतीच्या दारूच्या १८८ बॉटल जप्त केल्या.
दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना अटक
ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दलाची कारवाई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द